अर्जुनी-मोर. तालुक्यातील सावरटोला, सावरटोला, बोरटोला परिसरातील शेतकऱ्यांना सध्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर मका, उन्हाळी धान्ये आणि भाजीपाला यांची लागवड केली जाते. मात्र, रानडुक्कर, हरिण, काळवीट, सांबर, रानगाय आणि बिबट्या यांसारख्या वन्य प्राण्यांनी शेतीचे मोठे नुकसान केले आहे.
शेतकरी मोठ्या मेहनतीने उभे केलेले पीक वन्य प्राण्यांमुळे उद्ध्वस्त होत असल्याने अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झाल्याने कर्जबाजारीपणा आणि व्यापाऱ्यांकडून घेतलेल्या उधारीच्या परतफेडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय मुलांचे शिक्षण व इतर व्यवहारिक खर्च कसे भागवायचे, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.शेतकऱ्यांनी वारंवार वनविभागाकडे तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. वनविभागाकडून केवळ नाममात्र मदत केली जाते. एकरी उत्पन्न लाखोंच्या घरात असताना वन विभागाकडून फक्त ५ ते १० हजार रुपयांची मदत मिळते, असे स्थानिक शेतकरी यादवराव पाटील तरोणे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
शासनाने त्वरित लक्ष द्यावे!
शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी शासनाने आणि वनविभागाने त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा, आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.