‘माझी वसुंधरा’अभियान कार्यशाळेत सालेकसा,आमगाव व देवरी तालुक्यातील ग्रामपंचायतींचा सहभाग

0
16

गोंदिया,दि.०६ः पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत ग्रामपंचायत भजेपार येथे ५ मार्च रोजी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
ही कार्यशाळा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) मधुकर वासनिक यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. सालेकसा, आमगाव आणि देवरी तालुक्यातील गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, संगणक परिचालक यांनी या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.जिल्हा परिषद शाळेच्या डिजिटल क्लास रूममध्ये स्मार्ट बोर्डच्या स्क्रीनवर चित्रफित आणि पिपीटीच्या माध्यमातून उपस्थिताना माझी वसुंधरा अभियान कसे राबवावे, पंचतत्व निहाय कामे कशी करावी, टूलकिटच्या आधारे वर्षभर हे अभियान कसे राबवावे, केलेल्या कामांची व उपक्रमाची माहिती पोर्टलवर कशी भरावी, एमआयएस डाटा भरताना घ्यावयाची काळजी या विषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यशाळेत ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या भूमी, जल, वायू, अग्नी आणि आकाश अंतर्गत पंचतत्त्वांवर आधारित करण्यात आलेल्या तसेच आगामी काळात नियोजित असलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती भजेपार येथील सरपंच चंद्रकुमार बहेकार यांनी पीपीटीच्या माध्यमातून दिली. जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी, सरपंच, संगणक परिचालक यांना अभियानाची प्रभावी अमल बजावणी करण्याच्या सूचना देत गावपातळीवर कशी कामे करावीत यावर विस्तृत मार्गदर्शन केले. पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यासाठी ग्रामपंचायतींनी सक्रिय भूमिका बजवावी आणि नागरिकांचा सहभाग वाढवावा, असा संदेश गट विकास अधिकारी संजय पुरी यांनी दिला. प्रास्ताविक व सूत्र संचालन विस्तार अधिकारी गणेश मुनेश्वर यांनी केले तर आभार प्रा. डॉ. विवेक बहेकार यांनी मानले.या कार्यशाळेमुळे ‘माझी वसुंधरा’ अभियानाबद्दल अधिक जागरूकता निर्माण होऊन ग्रामस्तरावर प्रभावी अंमलबजावणीस चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.या कार्यशाळेला सालेकसा येथील विस्तार अधिकारी सेंदुरकर, सडक अर्जुनीचे विस्तार अधिकारी पराते, गोंदिया येथील विस्तार अधिकारी निमजे, आमगाव येथील विस्तार अधिकारी कुटे यांचेसह इतर अधिकारी, कर्मचारी, सरपंच, संगणक परिचालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.