गोंदिया,दि.०८ :- “पोलीस विभाग असू देत किंवा न्यायालय, वैद्यकीय विभाग, किंवा स्वयं सेवी सामाजिक संस्था प्रत्येक विभागाचा महिला सक्षमीकरण किंवा सुरक्षेमध्ये मोलाचा वाटा आहे. परंतु दुसऱ्याकडून सुरक्षेची अपेक्षा करत असताना सर्वप्रथम ती व्यक्ती स्वतः सबळ असावी याची जाणीव प्रत्येक नागरिकाला हवी.जेणेकरून ती कुटुंबावर, समाजाच्या वेगवेगळ्या घटकांवर निर्भर राहू नये” या विषयीचे प्रतिपादन गोंदिया शहर पोलिस स्टेशन उपनिरीक्षक आफरीन बिजली यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त गोंदिया शहर पोलीस विभाग, महाराष्ट्र अंनिस, संविधान मैत्री संघ, सर्वसमाज विचार मंच यांच्या संयुक्त वतीने आयोजित महिला हक्क व सुरक्षा जनजागृती चर्चा बैठक गोंदिया शहर पोलीस स्टेशन येथील सभागृहात आयोजित करण्यात आली होती,त्याठिकाणी त्या बोलत होत्या.
या प्रसंगी मंचावर प्रा.डॉ.दिशा गेडाम (अध्यक्ष सर्व समाज विचार मंच), प्रा.डॉ. निता खांडेकर,डॉ.स्वेतल माहुले (स्त्री रोग तज्ञ),एड.मंगला बनसोड (उपप्रमुख लोकरक्षक विभाग जिल्हा न्यायालय),अर्चना गिरी प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
प्रा. डॉ.दिशा गेडाम म्हणाल्या की महिलांची सुरक्षा ही एक सामाजिक जबाबदारी आहे, ज्यामध्ये समाजातील प्रत्येक सदस्याचे योगदान आवश्यक आहे. महिलांना सुरक्षित आणि सन्माननीय जीवन जगण्यासाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. डॉ.स्वेतल माहुले यांनी महिलांचे आरोग्य केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे म्हणजे समाजात एक मजबूत आणि निरोगी समुदाय घडवणे आवश्यक असल्याचे सांगितले.तर प्रा. डॉ. निता खांडेकर अशा सर्व सामाजिक रूढी, अनिष्ट चालीरीती, अतार्किक प्रथांशी लढण्यासाठी शिक्षण हे प्रमुख शस्त्र आहे. भारताच्या उज्वल भविष्याच्या दिशेने हे मोठे पाऊल आहे. स्त्री शिक्षणामुळे मुली आणि महिलांचे जीवनमान चांगले होते, त्यांच्या संधी वाढतात आणि समाजाच्या विकासाला मदत होते असे म्हणाल्या.यावेळी ऍड. मंगला बनसोड म्हणाल्या की स्त्रियांचे स्थान बळकट करण्यासाठी संविधानात अधिकार दिले गेले आहेत कारण या पुरुषप्रधान समाजात महिलांना केवळ लिंगाच्या आधारावर होणारा भेदभाव संपवण्यासाठी त्यांचे हक्क सुनिश्चित करणे आवश्यकच नाही तर त्या अधिकारांची अंमलबजावणी करणे देखील आवश्यक आहे.अर्चना गिरी यांनीही विचार व्यक्त केले.
या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळतर्फे वसंत गवळी,भोजराज ठाकरे, सि.पी. बिसेन, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे अनिल गोंडाने,राजू रहांगडाले, संविधान मैत्री संघ संयोजक अतुल सतदेवे, विद्यार्थी प्रतिनिधी आकांक्षा तुरकर, पोलीस पाटील संघटनेचे मंगला तिडके, माया चौधरी, प्रवीण कोचे,अर्चना गिरी, रवी आर्य, संगीता बागडे, डॉ संजय माहूले, कु.के.एच.पाटील, वनमाला सतदेवे, मनीषा शहारे, कांचन ठाकरे, प्रीती हेमने आदी अन्य उपस्थित होते.
जागतिक महिला दिन साजरा करताना महिलांच्या सुरक्षेची चिंता आणि काळजी वाटणे स्वाभाविक आहे. महिलांना संविधानिक हक्क कायद्यांची जाणीव करून देणे, महिलांवरील होणारे अत्याचार, गुन्हे रोखणे, महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे, महिलांना मानसिक आणि सामाजिक आधार देणे, समुपदेशन करणे आणि त्यांना कायदेशीर मदतीसाठी मार्गदर्शन करणे. महिलांच्या हक्कांसाठी आणि सुरक्षिततेसाठी जनजागृती मोहीम चालवणे, महिलांवरील होत असलेले अत्याचार,हिंसाचार रोखण्यासाठी नैतिक शिक्षणाला प्रोत्साहन देऊन त्यांना सक्षम बनवणे, विपरीत परिस्थितीत ज्या महिला वर आलेल्या आहेत त्यांचे उदाहरण समाजात ठेवणे ही नैतिक जवाबदारी असून सामाजिक संघटना व पोलीस प्रशासनाने एकत्रित सामंजस्य ठेऊन ही जवाबदारी पार पाडली पाहिजे अशा पद्धतीने बैठकीत चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थिनी आकांक्षा तूरकर हिने केले तर उपस्थितांचे आभार ज्येष्ठ नागरिक वसंत गवळी यांनी मानले.