गोंदिया शहरातील वाहतुक सुरळीत होण्याच्या दृष्टीने पार्कींगमध्ये अंशत: बदल

0
145

गोंदिया, दि.15 : गोंदिया शहराच्या मध्यभागी भाजी मार्केट आणि प्रमुख बाजारपेठ असल्याने त्या भागात दुचाकी वाहनांचा मोठ्या प्रमाणात आवागमन होत आहे. औद्योगिक विकासामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांच्या संख्येमध्ये वेगाने वाढ झाली असून रस्ते मात्र जुने व अरुंद आहेत. तसेच मुख्य बाजारपेठेत दुचाकी तसेच माल वाहतुक वाहने, हातठेले माल वाहतुक, रिक्षा यांचे प्रमाण वाढल्याने रोडवर ठिक-ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे वाहतुकीचे व पार्कींगचे प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.

          गोंदिया शहरातील वाहतुक सुरळीत व सुरक्षीत राहण्याच्या दृष्टीने तसेच सामान्य जनतेला धोका, गैरसोय व अडथळा निर्माण होवू नये म्हणून पोलीस अधीक्षक, गोंदिया यांनी त्यांना प्राप्त असलेल्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 (मुंबई अधिनियम क्र.22) चे कलम 33(1)(ब)(क) मधील तरतुदीनुसार प्रदान करण्यात आलेले अधिकारान्वये त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या गोंदिया शहरातील वाहतुक व पार्कींग संबंधाने पुढीलप्रमाणे अंशत: बदल करण्यात येत आहे.

         दुचाकी वाहनांसाठी सम/विषम तारखांना पाकींग : गांधी प्रतिमा ते राजेंद्र फॅशन कॉर्नर या मार्गावर सम तारखेस पूर्व बाजूस पार्कींग व विषम तारखेस पश्चिम बाजूस पार्कींग करण्यात येईल. ताला चाबी लाईन समोरील पोलीस स्टेशन गोंदिया (शहर) मागील भिंत (इलेक्ट्रीक डी.पी.) पर्यंत नो-पार्कींग. पोलीस स्टेशन (शहर) जवळ कवरराम बेकरी समोरील पूर्व बाजूस भिंत-पार्कींग. पोलीस स्टेशन गोंदिया (शहर) जवळ दिपक पान भंडार ते गोपालदास अग्रवाल यांचे निवास या पश्चिम बाजूस नो-पार्कींग. साई मेडीकल ते गोरेलाल चौक या मार्गावर सम तारखेस पूर्व बाजूस पार्कींग व विषम तारखेस पश्चिम बाजूस पार्कींग करण्यात येईल. अमन कलेक्शन ते श्री बाबा गुरुनानक शहा इलेक्ट्रॉनिक दुकान या मार्गावरील दोन्ही बाजूस पार्कींग करण्यात येईल. श्री हरिदेव मोबाईल ते राज इलेक्ट्रॉनिक (श्री टॉकीस चौक रोड) या मार्गावर सम तारखेस पूर्व बाजूस पार्कींग व विषम तारखेस पश्चिम बाजूस पार्कींग करण्यात येईल.

          सदर अधिसूचना 10 मार्च 2025 पासून पुढील आदेशापर्यंत अंमलात राहील, असे पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.