बाराभाटी येथे 33/11 के.व्ही.चे नवीन विद्युत उपकेंद्र मंजुर

0
73

= परीसरातील विज ग्राहकांची समस्या दुर होणार
अर्जुनी-मोर.-तालुक्यातील बाराभाटी येथे 33/11 के.व्ही. विद्युत उपकेंद्र मंजूर झाले असून या परिसरातील विजेची समस्या दूर होणार आहे. बाराभाटी येथे 33/11 के.व्ही. विद्युत उपकेंद्र मंजूर व्हावे अशी परिसरातील जनतेची मागणी होती. त्यानुसार वीज वितरण कंपनीचे अर्जुनी मोरगाव उपविभागाचे उपविभागीय अभियंता अमित शहारे यांनी आवश्यक प्रस्ताव तयार करून पाठविले. त्यानुसार आमदार इंजि. राजकुमार बडोले यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केल्यामुळे हे विद्युत उपकेंद्र मंजूर झाले आहे.
जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम 2024- 25  मध्ये टी. एस. पी. मध्ये अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बाराभाटी येथे 1× 5 एम व्ही ए चे 33/ 11 के.व्ही.चे नवीन उपकेंद्र मंजूर करण्यात आले.त्यासाठी 3 कोटी 83 लाख 42 हजारचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आदिवासी परिसर असलेला व वीस ते पंचवीस गावाचा विद्युत पुरवठा सुरळीत राहावा यासाठी बाराभाटी येथे नवीन 33/11 के.व्ही. उपकेंद्र मंजूर झाले आहे. नवीन विद्युत उपकेंद्रा मुळे बाराभाटी परिसरातील गावांची विद्युत समस्या दूर होणार आहे.
= ईळदा येथे विद्युत उपकेंद्र निधी अभावी प्रस्तावित=
तसेच आदिवासी अतिदुर्गम नक्षल प्रभावित असलेल्या इळदा येथेही 33 /11के.व्ही.चे वीज उपकेंद्र प्रस्तावित असून निधी अभावी सदर प्रस्ताव धूळ खात पडला आहे. इळदा येथे आदिवासी आश्रम शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रासह बरीचशी गावे संलग्न आहेत. हा परिसर अतिशय दुर्गम भागात मिळत असल्याने व ईडदा येथे 33/ 11 उपकेंद्र प्रस्तावित आहे. लोकप्रतिनिधींनी वेळीच पावले उचलून ईडदा येथे नवीन 33/ 11 के.वी.चे उपकेंद्र मंजूर करावे अशी मागणी जनतेने केली आहे.