चंद्रपूर : चांदा फोर्ट रेल्वे स्टेशन येथून गोंदिया मार्गे प्रवास करणाऱ्या नागरिकांना पार्किंग कंत्राटदाराकडून अवैध पद्धतीने त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी आम आदमी पार्टीकडे प्राप्त झाल्या आहेत. स्टेशन परिसरातील मुख्य मार्गांवर पार्किंग कंत्राटदाराने अनधिकृतपणे रस्सी अडथळा म्हणून लावून प्रवाश्यांकडून जबरदस्तीने पार्किंग शुल्क वसूल केला जात आहे. तसेच नागरिकांशी उद्धटपणे वागून शिवीगाळ व अपमानित करण्याचे प्रकार सुरू आहेत.
या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या वतीने चांदा फोर्ट रेल्वे स्टेशन मास्टर यांना निवेदन देण्यात आले असून, प्रवाशांच्या मुख्य मार्गावरून नियमबाह्य रस्सी तात्काळ हटवावी, तसेच प्रवाश्यांसोबत शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत वर्तन करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी स्पष्ट इशारा दिला की, “जर दोन दिवसांच्या आत योग्य ती कार्यवाही झाली नाही, तर आम आदमी पार्टीकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”
निवेदन देताना आपचे शहर अल्पसंख्यांक अध्यक्ष जावेद सय्यद, शहर वाहतूक अध्यक्ष जयदेव देवगडे, युवा जिल्हा उपाध्यक्ष अनुप तेलतुबडे, युवा जिल्हा संघटन मंत्री मनीष राऊत, युवा कार्यकर्ते सागर बोबडे, फाहीम शेख, राजिक भाई आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.