एक एप्रिलपासून अर्जुनी मोर. तालुक्यातील चारही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद

0
295

६५ गावांचा पाणीपुरवठा होणार बंद
अर्जुनी-मोर.दि.१६ः– तालुक्यातील रामपुरी, अर्जुनी मोरगाव, खांबी आणि सिरेगाव या चार प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून मागील १२ वर्षांपासून ६५ गावांना पिण्याचे पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र, शासनाने १ एप्रिल २०१९ पासून अनुदान बंद केल्याने या योजना चालवणाऱ्या संस्था आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. त्यामुळे संस्थांनी आज १६ मार्च रोजी नवेगावबांध येथील ग्रीन पार्क हॉटेलमध्ये सभा घेत येत्या १ एप्रिल २०२५ पासून चारही योजना पूर्णतः बंद करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे.

शासनाच्या अनुदान अभावामुळे निर्णय

या पाणीपुरवठा योजनांचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. वाढलेली मजुरी, रसायनांचा खर्च, विजेचे बिल आणि पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक इतर खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अनुदान मिळत नसल्याने या योजना दरवर्षी ४ ते ५ लाख रुपयांच्या तोट्यात जात आहेत. जिल्हा परिषदेमार्फत शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला गेला, मात्र अद्याप अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे संस्थाचालकांनी शासनाने १ एप्रिल २०२५ पूर्वी अनुदान दिले नाही, तर चारही योजना बंद करण्यात येतील, असा ठराव केला आहे.

संस्थाचालक आणि गावकऱ्यांचा एकमताने निर्णय

या महत्त्वाच्या सभेला चारही योजनांशी संबंधित गावांचे सरपंच, संस्थेचे संचालक व कर्मचारी उपस्थित होते. या वेळी उपस्थित सदस्यांनी एकमताने पाणीपुरवठा योजना बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जर शासनाने तातडीने हस्तक्षेप करून अनुदान मंजूर केले नाही, तर ६५ गावांना पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.या निर्णयामुळे ६५ गावांतील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शासनाने तातडीने लक्ष घालून अनुदान मंजूर करावे, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. अन्यथा, भविष्यात मोठ्या पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागेल.