अर्जुनी-मोर.मुंबई येथील इंदू मिल स्मारकासह संपूर्ण राज्यातील विविध संत महापुरुषांच्या स्मारकाचे कार्य जलद गतीने पूर्ण करण्यात यावे अशी मागणी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार इंजि. राजकुमार बडोले यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय हिवाळी अधिवेशनात केली.
यापूर्वी आमदार राजकुमार बडोले यांनी 16 फेब्रुवारी 2025 च्या पत्रानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांना महाराष्ट्रातील बौद्ध स्थळे व पर्यटन स्थळे तथा लेण्यांच्या पर्यटन विकासासाठी 2025- 26 च्या बजेट आराखड्यात 5 हजार कोटीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी केली होती. आणि आता हिवाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुंबईच्या हिंदू मिल स्मारकासह राज्यातील विविध महापुरुषांच्या स्मारकाचे कार्य लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली सन 2014 – 19 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने हिंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक तयार करण्याचा निर्णय घेतला होता.
स्टेचु ऑफ लिबर्टी पेक्षा देखील उंच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तिथे थाटात उभा राहणार असून देशाला प्रेरणा देणार आहे. त्यामुळे हिंदू मिल स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावे सोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्थळांचा विकास जसे दीक्षाभूमी, चिंचोली सोबतच विविध महापुरुषांच्या स्मारकांचा विकास करणे ज्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वस्ताद लहुजी साळवे, महात्मा फुले ,सावित्रीबाई फुले व इतर कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी आमदार राजकुमार बडोले यांनी विधानसभेत केली.या अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी चैत्यभूमी दादर मुंबई येथे हिंदू मिलच्या जागेवर भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचे काम सुरू असून त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे ,आद्य शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव येथे त्यांच्या कार्यास साजेसा स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मस्थळ वाटेगाव येथील स्मारकासाठी तसेच त्यांच्या नावे प्रस्तावित चिरागनगर मुंबई येथील संशोधन व प्रशिक्षण संस्थेसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संगमवाडी पुणे येथील वस्ताद लहुजी साळवे यांचे स्मारकाचे काम प्रगतीपथावर असल्याची घोषणा करून महापुरुषांच्या स्मारकासाठी सरकार निधी ची कमतरता पडू देणार नाही अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली.