अर्जुनी-मोर. () तालुक्यातील
विहीरगाव/बरड्या (ता. अर्जुनी मोरगाव) येथे दि. 6 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजताच्या सुमारास विहीरगाव येथील रहिवासी शंकर हरिजी मटाले यांच्या घराला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरीही घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
आगीत फर्निचर, कपडे, धान्य, दागदागिने, अंदाजे 27,000 रुपयांची रोख रक्कम आणि अन्य घरगुती वस्तू जळुन खाक झाले. विशेषतः कुमार सौरभ मटाले यांची शैक्षणिक कागदपत्रे आगीत भस्मसात झाल्याने त्यांच्या शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.
घटनेच्या वेळी घरातील सदस्य लग्नकार्य निमित्त गावाबाहेर गेले होते, त्यामुळे घर रिकामे होते. मात्र, घराशेजारी असलेल्या गोठ्यातील जनावरांवर आगीचे लोळ गेले असून काही जनावरांना किरकोळ दुखापत झाली आहे.
गावकऱ्यांनी तात्काळ धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला.ही घटना गोंदिया जि.प.चे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांचे कार्यक्षेत्रातील असल्याने व माहिती प्राप्त होताच त्यानी ताबडतोब अर्जुनी-मोर. नगरपंचायत च्या अग्नीशमन दलाशी संपर्क करुन अग्नीशमन वाहन घटनास्थळावर पाठवुन आगीवर नियंत्रण मिळविले.पन तोपर्यंत घरातील सर्व साहित्य जळुन खाक झाले होते.
या दुर्घटनेमुळे मटाले कुटुंबावर आर्थिक व मानसिक आघात झाला असून संपूर्ण कुटुंब संकटात सापडले आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाकडून तत्काळ मदतीची मागणी केली असून नागरिकांनीही या संकटग्रस्त कुटुंबाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.