वादळी पावसाने झोडपले, पण महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रात्रभर झुंज देत वीजपुरवठा केला पूर्ववत!

0
36

नागपूर, दि. 22 मे 2025: – बुधवारी (21 मे) रात्री 7.50 वाजताच्या सुमारास नागपूर शहराला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले. या अनपेक्षित पावसामुळे महावितरणच्या अजनी शाखा कार्यालयाच्या हद्दीतील 11 केव्ही सावरकर नगर, हिंदुस्तान कॉलनी आणि गावंडे लेआउट येथील वीज वाहिन्यांवर झाडांच्या फांद्या कोसळल्या. परिणामी या भागातील वीजपुरवठा खंडित झाला. याशिवाय, वेदांत पर्ल, वेदांत डायमंड आणि हिमवर्षा अपार्टमेंटसह अनेक वितरण रोहित्रेही बंद पडली.

 महावितरणची युद्धपातळीवर मोहीम

या आपत्कालीन परिस्थितीत महावितरणने तातडीने युद्धपातळीवर वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम हाती घेतले. सुरुवातीला 11 केव्ही गावंडे लेआउट वाहिनीचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला. त्यानंतर, रात्री 9.30 वाजता कोसळलेल्या झाडांच्या फांद्या बाजूला करून 11 केव्ही सावरकर नगर वाहिनीला ऊर्जा देण्यासाठी प्राधान्य देण्यात आले.

पुढील मोठे आव्हान 11 केव्ही हिंदुस्तान कॉलनी वाहिनीवर होते. हॉटेल रोसेटा क्लबजवळ वितरण पेटीची आउटडोअर जॉइंट इनकमर केबल खराब झाली होती, तसेच पिन आणि डिस्क इन्सुलेटरमध्ये बिघाड आढळला. कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून या वाहिनीवरील अनेक दोष दुरुस्त केले आणि गुरुवार (22 मे) मध्यरात्री 12.15 च्या सुमारास 11 केव्ही हिंदुस्तान कॉलनीचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश मिळवले.

 जाटतारोडी उपकेंद्रातील बिघाडही केला दुरुस्त

याच दरम्यान, 33 केव्ही जाटतारोडी उपकेंद्रातील 10 एमव्हीए रोहित्रात बुधवारी रात्री 7.53 वाजता बिघाड झाल्याने त्या रोहित्रावरून वीजपुरवठा करणाऱ्या सर्व वाहिन्या बंद पडल्या होत्या. मात्र, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही करत उंटखाना वाहिनीला एसटी स्टँड उपकेंद्रावरील 11 केव्ही ग्रेट नाग रोड वाहिनीवरून रात्री 8.40 वाजता वीजपुरवठा सुरू केला. 11 केव्ही राजाबक्षा वीज वाहिनीवर झाड पडल्याने वीजपुरवठा बंद झाला होता, तो रात्री 9.10 वाजता अंशतः आणि 11.30 वाजता पूर्णपणे सुरू करण्यात आला. 11 केव्ही पटेल चौक वाहिनीला 11 केव्ही एसटी स्टँड उपकेंद्रावरील 11 केव्ही घाट रोड वाहिनीवरून रात्री 11.15 वाजता सुरू करण्यात आले. याशिवाय, मेडिकल चौक वीज वाहिनीवरील वीजपुरवठा रात्री 9.15 वाजता सुरू झाला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जाटतारोडी उपकेंद्रातीलबंद पडलेला 10 एमव्हीए रोहित्र गुरुवारी मध्यरात्री 1.44 वाजता पुन्हा सुरू करण्यात आला.

शहरात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे ताजबाग रघुजी नगर, हनुमान नगर चंदन नगर अंतुगीनगर, तुलसीनगर स्वामीनारायण,  वाडी, हिंगणा, खडगाव, गोरेवाडा, अजनी, गिट्टीखदान, पोलिस लाईन, गायत्री नगर, झिंगाबाई टाकळी, ओम नगर, झिंगावाई टाकळी, किंग्सवे, क्लर्क टाऊन, दिनशॉ, गोरेवाडा, मेंटल हॉस्पिटल, खामला, सावरकर नगर, दीनदयालनगर, पेंशननगर, धरमपेठ, हिलटॉप, जयप्रकाशनगर, बुटीबोरी आदी भागातील वीज वाहिन्यांवर झाडाच्या फांद्या तुटून पडल्याने तारा तुटून वीज पुरवठा खंडित झाला होता. यापैकी बहुतांश वीजपुरवठा भर पावसात काम करुन अवघ्या 20 मिनिटे ते 3 तासांच्या कालावधीत पुर्ववत करण्यात महावितरणला यश मिळाले. ठिकठिकाणी पडलेल्या झाडाच्या फ़ांद्या बाजूला करण्याचे काम महावितरणकडून रात्री उशीरापर्यंत सुरु होते.

ग्राहकांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी

वादळी पावसामुळे निर्माण झालेल्या या आव्हानात्मक परिस्थितीत अजनी शाखा कार्यालयांतर्गत अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्याने वीज वितरण यंत्रणा विस्कळीत झाल्याने वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी वेळ लागला. या परिस्थितीत ग्राहकांना झालेल्या त्रासाबद्दल महावितरणने  दिलगिरी व्यक्त केली असून. आमच्या कर्मचाऱ्यांनी या कठीण काळात अहोरात्र काम करून वीजपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याची माहिती महावितरणने दिली आहे.