
चित्रा कापसे/तिरोडा- शिक्षण, सामाजिक प्रबोधन आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे माजी प्राध्यापक भास्कर राजाराम गायकवाड यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ९ जून रोजी मुंबई येथे आयोजित विशेष समारंभात त्यांना गौरविण्यात येणार आहे. प्रा. गायकवाड हे साई कॉलनी, नेहरू वॉर्ड, तिरोडा येथील रहिवासी असून, शहीद मिश्रा कनिष्ठ महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तीन दशके म्हणजे तब्बल ३० वर्षे त्यांनी प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पसरवला आहे. प्रा. गायकवाड हे केवळ शिक्षकच नाही, तर एक प्रभावी समाजप्रबोधक म्हणूनही परिचित आहेत. गेल्या ३५ वर्षांपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे वाङ्गय व संदेश यांचा प्रचार तसेच सामाजिक समतेच्या विचारांची मशाल जनतेपर्यंत पोहोचवत आहेत. विविध जाहीर व्याख्याने, चर्चासत्रे, शिबिरे यामधून त्यांनी समाजामध्ये जागृती घडवून आणली आहे. त्यांच्या कार्याची आणखी एक खास बाब म्हणजे समाजातील उपेक्षित, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना त्यांनी वेळोवेळी मदतीचा हात दिला. त्यांच्या प्रेरणादायी कार्यामुळे अनेक कुटुंबांना बळ मिळाले.
माझ्या या निवडीचे श्रेय● कुटुंब, सहकारी आणि समाजातील प्रत्येक घटकाला देतो. मी केवळ एक माध्यम आहे. बाबासाहेब आंबेडकर आणि तुकडोजी महाराज यांच्या विचारांनी माझे आयुष्य घडवले. माझे कार्य हे त्यांच्या प्रेरणेतूनच घडत गेले आहे.- प्रा. भास्कर गायकवाड, तिरोडा.