
गोंदिया,दि.18: जागतिक रक्तदाता दिवसाचे औचित्य साधून बाई गंगाबाई रक्तकेंद्र, जीएमसी गोंदिया येथे जिल्ह्यातील सर्व रक्तदान शिबिर आयोजकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे होते.
कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले, बाई गंगाबाई रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. नितीका पोयाम, तसेच विकृतीशास्त्र विभागप्रमुख व रक्तकेंद्र प्रभारी डॉ. अरविंद राठोड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातून जवळपास 150 रक्तदान शिबिर आयोजकांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. अधिष्ठाता डॉ. घोरपडे यांनी रक्तपेढीच्या दैनंदिन कार्यात आयोजकांचे मोलाचे योगदान अधोरेखित केले. तसेच लवकरच रक्त विघटीकरण सेवा (ब्लड कंपोनंट सेवा) सुरु करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
डॉ. पटले यांनी आपल्या भाषणात रक्तदानाचे अनमोल महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, “रक्त कुठल्याही कंपनीत बनत नाही, ते फक्त माणसाकडून मिळते, आणि त्यामुळे रक्तदान हे एक महान कार्य आहे.”कार्यक्रमात विभागातील वरिष्ठ अध्यापक डॉ. योगेश पटले, डॉ. पल्लवी गेडाम, तसेच निवासी डॉक्टर्स डॉ. सोनल मेश्राम, डॉ. विनय मिराणी, डॉ. पूजा बांबोरडे, डॉ. गोल्डी पटले, डॉ. संबोधी किल्लेदार, डॉ. उत्कर्षा राऊत, डॉ. अरीज, डॉ. अमानी, डॉ. अन मेरी, डॉ. शुभांगी यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञ युवराज जांभुळकर, अमित मून, अमित थावरे, निलेश राणे, आनंद पडोरे, अमन दरवाडे यांचे विशेष सहकार्य लाभले. वैद्यकीय समाजसेवा अधिक्षक विजय बिसेन व सनी रामटेके यांनी शिबिर आयोजकांसोबत समन्वय साधण्यात मोलाची भूमिका बजावली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी मेंढे यांनी केले तर आभार पूजा इंगळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धर्मेंद्र हरीणखेडे, सुनील सांडेलगोत्रे, पायल येरपुढे व मोना नागरीक यांनी मोलाचे सहकार्य केले.