Home विदर्भ वनविभागाने लोकाभिमुख कामे करावीत-पालकमंत्री बडोले

वनविभागाने लोकाभिमुख कामे करावीत-पालकमंत्री बडोले

0

गोंदिया, दि.४ : गोंदिया जिल्हा वनसंपदेने नटलेला असून वनावर आधारित जास्तीत जास्त रोजगार स्थानिकांना उपलब्ध झाला पाहिजे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळाला जास्तीत जास्त पर्यटकांनी भेटी देण्याच्या दृष्टीने वनविभागाने लोकाभिमुख कामे करावीत असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
कोहमारा येथील नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय इमारतीचे उदघाटन पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश शिंदे, वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक संजय ठवरे, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, परिविक्षाधीन आय.एफ.एस.अधिकारी श्री गुरुप्रसाद, तहसिलदार एन.जी.उईके, जि.प.सदस्य मिलन राऊत, राजेश्वर धनबाते, पं.स.उपसभापती दामोधर नेवारे, पं.स.सदस्य मधुसुदन दोनाडे, मजूर संघाचे अध्यक्ष झामसिंग येरणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कॅम्पा २०१३-१४ च्या निधीतून या इमारतीचे बांधकाम करण्यात आले असून यावर १२ लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहे.
बडोले पुढे म्हणाले, सकारात्मक वाटचाल करण्याचा आपला प्रयत्न आहे. या माध्यमातून परिसरातील लोकांचे प्रश्न निकाली काढण्यात येतील. राष्ट्रीय बांबू मिशन अंतर्गत भविष्यात बांबू प्रकल्प निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. यामधून जास्तीत जास्त लोकांना बांबूवर आधारित रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते नवाटोला, जांभूळपाणी, कोसबी, फक्की, खोबागोंडी व कोलरगाव येथील लाभार्थ्यांना कॅम्पा २०१३-१४ निधी अंतर्गत धनादेशाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, निसर्गप्रेमी, नागरिक तसेच लाभार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनसंरक्षक संजय ठवरे यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार विलास काळे यांनी मानले.
०००००

Exit mobile version