Home विदर्भ जलयुक्त शिवार कार्यशाळा

जलयुक्त शिवार कार्यशाळा

0

गोंदिया, दि.8 : गावात पडणारे पावसाचे पाणी गावातच साठवले जावे आणि गावासाठी त्याचा वापर व्हावा या उद्देशाने गोरेगाव पंचायत समिती सभागृहात जलयुक्‍त शिवार अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा गोरगाव तहसलिदार कु. शिल्पा सोनूने अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. कार्यशाळेचे उदघाटन गोरगावचे गटविकास अधिकारी श्री चव्हाण यांनी केले. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून सदस्य सचिव तथा तालुका कृषि अधिकारी मंगेश वावधने उपस्थित होते.
यावेळी शेतकरी बांधवाना मार्गदर्शन करतांना शिल्पा सोनूने यांनी सांगितले, या अभियानाअंतर्गत पाणलोट विकासाची कामे, सिमेंट नालाबांध, पाझर तलाव, गावतलाव, साठवणतलाव, शिवकालीन, ब्रिटीशकालीन तलाव, मामातलावाचे पुनरुज्जीवन, ओढा, नाले, जोडप्रकल्प राबविणे, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर, पाणीवापर संस्था बळकट करणे, विहीरी/बोरवेलचे पुर्नभरण करणे, मध्यम व मोठया प्रकल्पाची उभारणी करणे या बाबींवर भर दिला जाईल.
मंगेश वावधने यांनी सांगितले, उपलब्ध पाण्याचा नियोजनबध्द वापर, पाण्याचे नवीन स्त्रोत निर्माण व्हावे याकरीता पाण्याचे ऑडीट करण्यात येईल. कृषि उत्पादकता व गुणवत्ता वाढविणे या अभियानाचे उद्दीष्ट असून त्याकरीता प्रभावी नियोजन करण्यात येईल. कार्यक्रमाचे संचालन श्री शहा यांनी केल तर आभार श्री रंगारी यांनी मानले. कार्यक्रमाला पाणलोट समितीचे सचिव, अध्यक्ष, ग्रामसेवक, तलाठी, कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, जि.प. ग्रामसेवक तसेच कृषि पर्यवेक्षक मेडे, शहा, सीरसाठे, कोहाड, प्रतिभा बडोले व शेतकरी बांधव मोठयासंख्येने उपस्थित होते.

Exit mobile version