गडचिरोली जि.प. खर्चातही नापास

0
9

गडचिरोली- जिल्हा परिषदेला केंद्र व राज्य शासनाकडून हस्तांतरण, अभिकरण, जिल्हा निधी व १३ वने अनुदान या चार मुख्य लेखाशिर्षातून दरवर्षी लाखों रूपयांचा निधी प्राप्त होत असतो. सदर निधी जिल्हा परिषदेच्या सर्व १३ विभागांना आवश्यकतेनुसार वितरित केल्या जातो. हस्तांतरण योजनेंतर्गत जिल्हा परिषदेला १३ विभागांना डिसेंबर २०१४ अखेरपर्यंत एकूण ३९३८८.९३ लाखांचा निधी प्राप्त झाला. यापैकी २०१४ च्या नोव्हेंबर अखेरपर्यंत सर्व विभागांने मिळून १८४४५.८८ लाख रूपयांचा निधी खर्च झाला. डिसेंबर महिन्यात ६८४१.७२ लाखांचा निधी खर्च झाला. डिसेंबर अखेरपर्यंत जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व विभाग मिळून एकूण २५२८७.६० लाख रूपयाचा निधी खर्च केला. या खर्चाची टक्केवारी ६४.२० आहे. हस्तांतरण योजनेचा जिल्हा परिषदेकडे १४१०१.३३ लाखांचा निधी शिल्लक आहे.

अभिकरण योजनेच्या मुख्य लेखाशिर्षातून जिल्हा परिषदेच्या सात विभागांना डिसेंबर २०१४ अखेरपर्यंत २६२९.०७ लक्ष रूपयांचा निधी प्राप्त झाला. यापैकी २०१४ च्या नोव्हेंबर अखेरपर्यंत सात विभागांनी ८८५.३३ तर डिसेंबर अखेरपर्यंत ९११.५४ लक्ष रूपयाचा निधी खर्च केला. या खर्चाची टक्केवारी ३४.६७ आहे. या योजनेचा १७१७.५३ लक्ष निधी जिल्हा परिषदेकडे शिल्लक आहे. जिल्हा निधीच्या लेखाशिर्षातून १९ विभागांना डिसेंबर २०१४ अखेरपर्यंत एकूण १९१४.३० लक्ष रूपयांचा निधी प्राप्त झाला. यापैकी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्हा परिषदेच्या १९ विभागांनी ५२२.४६ लक्ष रूपयांचा निधी खर्च केला. डिसेंबर महिन्यात १५७.७० लक्ष रूपये खर्च करण्यात आले असून २०१४ च्या डिसेंबर अखेरपर्यंत १९ विभागांनी ६८०.१६ लक्ष रूपयांचा निधी खर्च केला. या खर्चाची टक्केवारी ३५.५३ असून जिल्हा निधी लेखाशिर्षाचा डिसेंबर २०१४ अखेरपर्यंत १२३४.१४ लक्ष रूपयांचा निधी शिल्लक आहे. जिल्हा परिषदेच्या २०१४-१५ या वर्षाच्या मूळ अंदाजपत्रकात वन महसूल लेखाशिर्षातून एकूण १२२९.५० लक्ष रूपयांचा निधी प्राप्त झाला. यापैकी २०१४ च्या नोव्हेंबर अखेरपर्यंत ११ विभागांनी २४२.९८ लक्ष रूपयांचा निधी खर्च केला.

डिसेंबर महिन्यात ४९.८२ लक्ष रूपयाचा निधी खर्च झाला असून डिसेंबर अखेरपर्यंत २९२.८० लाख रूपयाचा निधी खर्च झाला. ११ विभाग मिळून या खर्चाची टक्केवारी २३.६२ असून वन महसूल लेखाशिर्षाचा डिसेंबर अखेरपर्यंत ९४६.७० लक्ष रूपयांचा निधी शिल्लक आहे.