संगणक परिचालकांचा आक्रोश रस्त्यावर

0
10

चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत कार्यरत परिचालकांवर महाआॅनलाईन कंपनी अन्याय करीत आहे. टार्गेटच्या नावाखाली कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधनही हडप करण्यात आले. जिल्ह्यातील ३०० ते ४०० परिचालकांना तीन महिन्यांपासून मानधन दिलेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या संगणक परिचालकांचा आक्रोश सोमवारी रस्त्यावर उतरला. परिचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून प्रशासन व पालकमंत्र्यांचा जाहिर निषेध केला.

जिल्ह्यात ८४७ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींचे काम संगणकीकृत करण्यात आले. त्यामुळे ग्रामपंचायतींशी निगडित लहान-मोठी कामे संगणकांच्या माध्यमातून होत आहे. मात्र परिचालकांना केवळ ३ हजार ८०० ते ४ हजार १०० रुपये मानधन दिले जात आहे. पगारवाढ, कायम नियुक्ती द्या आणि महाआॅनलाईनचा करार रद्द करावा या मागण्यांसाठी संगणक परिचालक संघटनेने काही दिवसांपुर्वी संप केला होता.

१२ नोव्हेंबर ते २२ जानेवारी २०१५ पर्यंत हा संतप चालला. यादरम्यान मुंबई येथे साखळी उपोषणही करण्यात आले. तेव्हा ग्रामविकास राज्यमंत्र्यांनी महाआॅनलाईनचे कंत्राट रद्द करण्यासोबतच अन्य मागण्या सोडविण्याचे आश्वासन संघटनेला दिले होते. मात्र त्यानंतर संपात सहभागी झालेल्या शेकडो कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने काढण्यात आले. त्यामुळे संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर त्यांना कामावरही घेण्यात आले. मात्र अजूनही २५ ते ३० परिचालकांना अजूनही कामावर घेण्यात आलेले नाही. गेल्या काही महिन्यांपासून तीनशे ते चारशे संगणक परिचालकांचे मानधन रोखण्यात आले आहे. केवळ टार्गेटच्या नावाखाली मानधन हडप करण्यात येत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने केला आहे.

मानधनाबाबत वारंवार विचारणा केली, असता अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. ई- बँकिंग सुविधेअंतर्गत काम केलेल्या संगणक परिचालकांना कमिशन मिळाले नाही. कमीशन तत्काळ देण्यात यावे, शासकीय सेवेत सामावून घ्यावे, १२ हजार रुपये वेतन देण्यात यावे, भविष्य निर्वाह निधी आणि प्रवास भत्ता देण्यात यावा, थकीत मानधन अदा करावे, कामावरुन कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर परत घ्यावे यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी मोर्चा काढण्यात आला. गांधी चौकातून प्रमुख मार्गाने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर जिल्हा परिषदेत पोहोचला. संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र गेडाम, धनराज रामटेके, प्रशांत डवले यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चात शेकडो संगणक परिचालक सहभागी झाले होते