Home गुन्हेवार्ता गळा चिरुन युवतीची हत्या

गळा चिरुन युवतीची हत्या

0

कुरखंडा, दि.२: एका युवतीची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची घटना आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास कुरखेड्यापासून १ किलोमीटर अंतरावरील गांधीनगर(डिप्राटोला)-तळेगाव रस्त्यावरील जंगलात उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.डिप्राटोला-तळेगाव हा मार्ग साधारणत: ३ किलोमीटर लांबीचा असून, तो फार वर्दळीचा नसतो. या मार्गावर डिप्राटोला गावापासून एक किलोमीटर अंतरावरील जंगलात एक युवती मृतावस्थेत असल्याचे गुराख्यांना आढळून आली. जवळ जाऊन पाहिले असता तिचा गळा चिरल्याचे दिसून आले. ही वार्ता पसरताच परिसरात खळबळ माजली. उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे, सहायक पोलिस निरीक्षक गजानन पडळकर हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. मृत युवतीचा वर्ण गोरा असून, ती ५ फूट उंचीची आहे. तिचे वय अंदाजे १७ ते १८ वर्षे असावे. तिने काळा जीन्स पँट, टॉप व त्यावर काळ्या रंगाचा जर्किन परिधान केला होता. तिच्या चेहऱ्याला उधळी लागली होती. मृतदेहाशेजारी ब्लेडचे आतील कव्हर होते. यावरुन ब्लेडने गळा चिरुन तिची हत्या केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तिच्या खिशाचा आतील भाग बाहेर आल्याचे दिसत होते. त्यामुळे मारेकऱ्याने तिच्या खिशातून मोबाईल काढला असावा, अशी शक्यता आहे. या घटनेचा उलगडा पोलिस तपासानंतरच होणार आहे.

Exit mobile version