Home गुन्हेवार्ता विदर्भ एक्स्प्रेसमधून पावणेतीन लाखाचे दागिने लंपास

विदर्भ एक्स्प्रेसमधून पावणेतीन लाखाचे दागिने लंपास

0

गोंदिया,दि.17 : मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसमधून २ लाख ७६ हजार १०४ रुपये किमतीचे दागिने पळविल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जयंत देवेंद्रभाई जसानी (७१) रा. गोंदिया हे आपल्या पत्नीसह मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसने गोंदियाला जात होते. ए-३ कोचमधील ३७, ३९ या बर्थवरून ते प्रवास करीत होते. विदर्भ एक्स्प्रेस सकाळी प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर आली. दरम्यान जयंत कोचच्या बाहेर आले. त्यांच्या पत्नी बर्थवर झोपल्या होत्या. त्यांच्या उषाखाली असलेली पर्स अज्ञात आरोपीने पळविली. पर्समध्ये सोन्याच्या बांगड्या, सोनसाखळी (२), मंगळसूत्र डायमंड पेंडंटसह, नथ, मनगटी घड्याळ आणि २० हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ७६ हजार १०४ रुपये किमतीचा मुद्देमाल होता. याप्रकरणी गोंदिया लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवून नागपूर लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला आहे. दरम्यान सीसीटीव्हीत संपूर्ण प्लॅटफार्मचे चित्रीकरण कव्हर होत नसल्यामुळे सीसीटीव्हीत काहीच आढळले नाही. नागपूर स्थानकावर विदर्भ एक्स्प्रेस थांबल्यानंतर एक २० ते २२ वयोगटातील तरुणी गाडीत बसली. जीन्स आणि टी शर्ट घातलेल्या या तरुणीवर लोहमार्ग पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.

Exit mobile version