Home Featured News सारस महोत्सवानिमित्त सायकल रॅलीत जिल्हाधिकार्यांचा सहभाग

सारस महोत्सवानिमित्त सायकल रॅलीत जिल्हाधिकार्यांचा सहभाग

0

वन्यजीव व पर्यावरण रक्षणाचा संदेश
गोंदिया,दि.५ : सारस महोत्सवाचे औचित्य साधून आज ५ जानेवारीला सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. दुर्मिळ व नामशेष होत चाललेला सारस हा पक्षी केवळ गोंदिया जिल्हयातच आढळत असल्यामुळे ऐश्वर्यसंपन्न सारस पक्षांचे व अन्य पक्षांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी जिल्हयात लोकचळवळ उभी झाली आहे.
केटिएस जिल्हा सामान्य रुग्णालय येथून निघालेल्या सायकल रॅलीचे नेतृत्व जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीणा, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगांवकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवि धकाते, वरिष्ठ शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र जैन यांनी सहभाग घेतला.
ही रॅली केटिएस जिल्हा सामान्य रुग्णालय येथून नेहरु चौक, गोरेलाल चौक, गांधी पुतळा, जयस्तंभ चौक मार्गाने मार्गक्रमण करीत केटिएस जिल्हा सामान्य रुग्णालय येथे समाप्त झाली. रॅलीत संत तुकाराम हायस्कूल, महावीर मारवाडी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नगर परिषद कन्या शाळा आणि राजस्थान कन्या शाळा येथील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. रॅलीत सारस व वन्यजीवांच्या संरक्षण व संवर्धनाचे संदेश देणारे ङ्कनिसर्ग माय ची अपत्य प्यारे, सुखे नांदू वनचर सारेङ्क असे फलक घेऊन विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले होते. सारस पक्षाचा वेश परिधान केलेले मुन्नालाल यादव सायकल रॅलीचे आकर्षण होते.
सारससह अन्य वन्यजीवांच्या संरक्षण व संवर्धनासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून सारस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सायकल रॅलीत वन्यजीव प्रेमी मुकूंद धुर्वे, रुपेश निंबार्ते, त्र्यंबक जारोदे, रवि गोलानी, राज खोडेचा, अनिल भगचुंदानी तसेच  डॉ. सुवर्णा हुबेकर, गटशिक्षणाधिकारी अशोक बरईकर, लागवड अधिकारी श्री कुंभलकर, डॉ. विजय ताते यांचेसह विविध शाळांचे शिक्षकवर्ग सायकल रॅलीत सहभागी होते. उपस्थित विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वन्यजीवाचे संरक्षण व संवर्धनासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता विशद केली. परिक्षेकरीता उपस्थित रॅलीतील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version