Home Featured News देवरीच्या श्मशानभूमी स्वच्छतेसाठी झटतोय ‘हेल्पिंग ग्रुप’

देवरीच्या श्मशानभूमी स्वच्छतेसाठी झटतोय ‘हेल्पिंग ग्रुप’

0

‘हेल्पिंग ग्रुप’ची परिसर स्वच्छतेसाठी श्रमदान मोहीम

सुरेश भदाडे

देवरी,दि.२५-श्मशानभूमी म्हटले की स्वच्छतेबाबतीत उपेक्षित असे ठिकाण. श्मशानभूमीतील मालमत्तेची टवाळकी करणारी मंडळी कशी रंगरंगोटी करते, हे सर्वांच्याच परिचयाचे आहे. त्यातच नगरपंचायतीची उपेक्षा पाचवीला पूजलेलीच. अशात देवरीतील परिसर स्वच्छतेसाठी पुढे आले ते स्थानिक ‘हेल्पिंग ग्रुप’. गेल्या पाचच महिन्यात या ग्रुपचे सदस्य परिसरात चर्चेचा विषय बनले. प्रत्येक रविवारी हा ग्रुप परिसर स्वच्छता करताना आपणास आढळून येतो. आता तर स्थानिक मोक्षधाम स्वच्छ ठेवण्याचा विडाच या हेल्पिंग ग्रुपच्या सदस्यांनी उचल्याचे दिसून येत आहे.

देवरी शहरात गेल्या पाच महिन्यांपूर्वी काही युवक एकत्र आले. गप्पा रंगल्या. त्यातूनच काहींनी अफलातून कल्पना सूचविली. आणि पहाता पहाता त्यावर क्रियांन्वयन सुद्धा करण्याची निर्धार त्या युवकांनी केला. मग सुरू झाली नगरातील अस्वच्छ परिसराची साफसफाई. दर रविवारी युवकांचा एक टोळका नित्यनेमाने शहरातील अस्वच्थ परिसराची स्वच्छता करू लागला.

या युवकांनी स्थानिक प्रशासनाशी रीतसर संपर्क करण्याचा प्रयत्न सुद्धा केला. मात्र, दखल घेणार तर तो प्रशासन कसला. तरी प्रशासनाच्या मदतीची आस न बाळगता या युवकांनी आपले कार्य अधिक नेटाने पुढे नेण्याचे प्रयत्न कायम ठेवले. हा उपक्रम राबवित असताना त्यांना आठवण झाली ती आपल्या नगरातील श्मशान भूमीची. श्मशान भूमीत सर्वत्र साचलेली ती घाण आणि उनाड मुलांनी रंगविलेल्या निवाऱ्यांच्या भिंती या युवकांना खटकल्या. आणि निर्धार केला तो दर रविवारी श्मशानभूमी स्वच्छता अभियान राबविण्याचा. उल्लेखनीय म्हणजे हेल्पिंग ग्रुपच्या माध्यमातून मोक्षधाम परिसरात वृक्षारोपन करून झाडांचे संरक्षण करून त्यांची जोपासना करण्याचा मानस या युवकांनी बोलून दाखविला आहे.

गेल्या पाच महिन्यापासून २१ आठवडे पूर्ण झाले या ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेला. आज श्मशानभूमीचा तो परिसर आपल्याला स्वच्छ आणि लकाकताना दिसतो, तो या हल्पिंग ग्रुपच्या सदस्यांच्या श्रमदानामुळे. या ग्रुपमधील सदस्यांमध्ये प्रामुख्याने सचिन भांडारकर, सुजित अग्रवाल, इंजी.हेमंत ताराम, बाळकृष्ण राऊत, इंजी. जय साखरे, शुभम मरसकोल्हे, इंजी.राकेश निनावे, कोमल भेलावे, इलियाज कुरैशी, सोमन चव्हाण, दीपक लांजेवार, सत्यनारायण अग्रवाल यासह अनेक तरूणाचा सहभाग असतो. परिसर स्वच्छता आणि श्रमदान याशिवाय हा ग्रुप अनेक समाजाला उपयोगी असे कार्य करीत असतो. त्यामुळे हेल्पिंग ग्रुप हा अल्पावधितच देवरीकरांच्या कौतुकास पात्र ठरला आहे. आज देवरी शहरातील हा ग्रुप अनेकांसाठी आदर्श ठरतो आहे.

याशिवाय हा ग्रुप गेल्या अनेक वर्षापासून अनेक सामाजिक उपक्रमात हिररीने भाग घेत असतो. रक्तदान शिबीर असो की गरजूंना मदत करण्याचा प्रश्न असो, युवकांचे मार्गदर्शन शिबीर असो की परिसरात अपघाताची घटना असो, या ग्रुप मधील प्रत्येक सदस्य मदतीसाठी तत्पर असतो. रस्त्यावर कोणी अनोखळी इसम पडून जरी असला तर तो आपल्या घरी कसा पोचू शकेल, यासाठी हे युवक नेहमीच दक्ष असतात. एवढेच नव्हे तर या ग्रुपमधील सदस्य जर कोठेही प्रवासाला गेला असेल तर त्या भागात गेलेल्या परिसरातील  इतरही लोकांना परतीसाठी लिफ्ट देण्याचे कार्य विशेषतः सामाजिक माध्यमांवर तसे संदेश प्रसारित करून मदत करण्याचे कार्य सुद्धा तितकेच वाखाणण्याजोगे आहे.

Exit mobile version