Home Featured News देवरी कॅम्प निवासस्थानाला ‘रिव्यानी’चे नाव

देवरी कॅम्प निवासस्थानाला ‘रिव्यानी’चे नाव

0

देवरी,दि.07 : अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या देवरी कॅम्प येथील निवासस्थानाचे ‘रिव्यानी’ असे नामकरण (दि.६) करण्यात आले. या माध्यमातून रिव्यानीच्या स्मृतींना नेहमी उजाळा मिळत राहावा, हा या मागील उद्देश असल्याची प्रतिक्रिया अप्पर पोलीस अधिक्षकांनी व्यक्त केली आहे. सदर फलकाचे अनावरण रिव्यानीचे वडील राधेश्याम रहांगडाले, आई यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्र माला अप्पर पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, देवरी उपमुख्यालयातील अधिकारी, कर्मचारी, सी ६० पथकाचे सर्व अधिकारी, कमांडर तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते.

रिव्यानी ही गोंदिया पोलीस दलातील पोलीस कर्मचारी शासकीय वाहन चालक राधेश्याम रहांगडाले यांची ६ वर्षांची मुलगी होती. २७ एप्रिल २०१८ रोजी रस्ता अपघातात जखमी झालेल्या रिव्यानीचा आठवडाभरानंतर मृत्यू झाला. राधेश्याम रहांगडाले यांनी आपल्या मुलीचे अवयव दान केले. रिव्यानीचे दोन डोळे, फुप्फुस, हृदय, किडनी, त्वचा एकूण सात अवयव लहान गरजू मुलांसाठी दान केले. यामुळे दोन तीन बालकांना जीवनदान मिळाले. रिव्यानीच्या आई-वडिलांनी यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद होता. त्यांची ही कृती त्यांचे दातृत्व स्पष्ट करणारी आहे.रिव्यानीच्या पवित्र स्मृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने देवरी कॅम्पच्या वतीने रविवारी निवासस्थानाचा सदर नामकरण सोहळा पार पाडण्यात आला.

Exit mobile version