Home मराठवाडा राज्य शासनाचा मलेशियन कंपनीसोबत रस्ते विकासासाठी दहा हजार कोटींचा करार

राज्य शासनाचा मलेशियन कंपनीसोबत रस्ते विकासासाठी दहा हजार कोटींचा करार

0

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम
विभाग व ‘सीडबी’यांच्यात करार

– ‘सीडबी’ कंपनी राज्यात दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

– नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती मार्ग निर्मितीसाठी सीडबी कंपनी इच्छुक

मुंबई, दि. 30 : महाराष्ट्रातील रस्ते विकासामध्ये मलेशियातील
कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री डेव्हलपमेंट बोर्ड (सीडबी) ही कंपनी सुमारे दहा
हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि
सीडबी होल्डिंग या कंपनीमध्ये आज यासंबंधीचा सामंजस्य करार मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला.
वर्षा निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात ‘सीडबी’चे चेअरमन जुडिन बीन
अब्दुल करीम आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह
यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय,
एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे, महाराष्ट्र रस्ते विकास
महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार,
विभागाचे सचिव एस.बी. तामसेकर, सी. पी. जोशी यांच्यासह `सिडबी`चे दातो सु
ली, ज्युलीया बीन, अब्दुल करीम, अब्दुल लतिम थिन, झायनोरा झैनल, नुरुल
हयाती खलील आदी यावेळी उपस्थित होते.
‘सीडबी होल्डिंग’ ही कंपनी मलेशियन सरकारचा उपक्रम असून ती
मलेशियातील अग्रगण्य कंपनी आहे. ही कंपनी महाराष्ट्रातील रस्त्यांचे
सर्वेक्षण करून त्यांचा विकास करणार आहे. यासाठी ही कंपनी राज्यात दहा
हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. तसेच नागपूर-मुंबई शीघ्रसंचार
द्रुतगती मार्गाच्या कामातही ही कंपनी सहभागी होण्यास उत्सुक आहे.
यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र हे
देशातील आर्थिक, औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य आहे. राज्यातील पायाभूत
सुविधांच्या विकासात रस्ते विकास हा महत्त्वाचा घटक आहे. या पायाभूत
सुविधांच्या विकास कामात सीडबी कंपनीने उत्सुकता दाखवून करार केला ही
आनंदाची गोष्ट आहे. प्रत्यक्ष कामे सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र शासन व
सीडबी कंपनी यांना पायाभूत विकासासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. तसेच
सीडबी कंपनीने नागपूर मुंबई शीघ्रगती संचार महामार्गाची निर्मिती ही
ऐतिहासिक घटना ठरणार आहे. त्यामुळे या निर्मितीमध्ये सहभागी झालेल्या
कंपन्या या इतिहासाच्या साक्षीदार ठरणार आहेत.
श्री. जुदेन बिन अब्दुल करीम म्हणाले की, सीडबी कंपनीने
मलेशियात पायाभूत सुविधा क्षेत्रात काम केले आहे. महाराष्ट्रातील रस्ते
निर्माणातून शाश्वत विकास करण्यासाठी कंपनीला आनंद वाटत आहे. सुरक्षित
आणि चांगल्या दर्जाच्या रस्त्यांच्या निर्मितीसाठी नाविण्यपूर्ण व
नवतंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे.

Exit mobile version