Home Top News गडचिरोली येथे 7 नक्षल्यांना कंठस्नान

गडचिरोली येथे 7 नक्षल्यांना कंठस्नान

0

गडचिरोली,दि.६(सुचित जम्बोजवार): सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर उपपोलिस ठाण्यांतर्गत कल्लेड येथील जंगलात आज  सकाळी झालेल्या चकमकीत पोलिसांच्या सी-६० पथकाच्या जवानांनी ७ नक्षल्यांचा खात्मा केला. यात ५ महिला, तर २ पुरुष नक्षल्यांचा समावेश आहे. या घटनेमुळे मागील महिन्यात ५ निरपराध नागरिकांचे हत्यासत्र चालविणाऱ्या नक्षल्यांना जबर फटका बसला आहे.

कल्लेड जंगलात नक्षल्यांचे शिबिर सुरु असल्याची विश्वसनीय माहिती मिळाल्यानंतर सी-६० पथकाचे कमांडर मोतीराम मडावी यांच्या नेतृत्वातील पथक त्या भागात नक्षलविरोधी अभियान राबवीत होते. आज सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार केलाच नक्षलवादी जंगलात पसार झाले. घटनास्थळाची पाहणी केली असता त्यात ५ महिला व २ पुरुष नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले. पोलिसांनी नक्षल्यांची शस्त्रे व अन्य साहित्यही ताब्यात घेतल्याची माहिती आहे. घटनास्थळी हेलिकॉप्टर पाठविण्यात आले असून, मृतदेह दुपारपर्यंत पोलिस मुख्यालयी आणण्यात येणार आहेत. घटनास्थळी वरिष्ठ कॅडरचे नक्षलवादी असावेत, असा अंदाज आहे.

२ डिसेंबरपासून नक्षल्यांनी स्थापन केलेल्या पीपल्स लिबरेशन गुर्रिला आर्मीचा १७ वा स्थापना सप्ताह सुरु झाला आहे. या सप्ताहापूर्वीच नक्षल्यांनी संपूर्ण जिल्हाभरात उच्छाद मांडून पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन ५ नागरिकांची हत्या केली. शिवाय कोटगूल येथील भूसुरुंगस्फोटात हवालदार सुरेश गावडे, तर टवे येथील जंगलात झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे जवान मंजुनाथ शिवलिंगप्पा हे शहीद झाले. त्यानंतर पीएलजीए सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलिस महासंचालक डी.कनकरत्नम व पोलिस महानिरीक्षक शरद शेलार हे जिल्ह्यात तळ ठोकून बसले असून, नक्षल्यांची हालचालीवर बारिक लक्ष ठेवून पोलिसांना मार्गदर्शन करीत आहेत. आज त्यांच्या मार्गदर्शनात ७ नक्षल्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. अलिकडच्या काळातील सी-६० पथकाने केलेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे.

Exit mobile version