Home विदर्भ डोंगरगावातील आपादग्रस्तांसाठी प्रभावी उपाययोजना करा- टोलसिंह पवार

डोंगरगावातील आपादग्रस्तांसाठी प्रभावी उपाययोजना करा- टोलसिंह पवार

0

 

माजी जि.प.अध्यक्षांनी केली आर्थिक मदत

देवरी,दि.17- देशात स्वातंत्र्याचा आनंदोत्सव केला जात असताना निसर्गाने देवरी तालुक्यातील डोंगरगाव येथील ग्रामस्थांवर अवकृपा केली. या निसर्गाच्या तडाख्यामध्ये ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. अशा प्रसंगी शासन-प्रशासना कडून डोंगरगाववासींना मदतीची अपेक्षा आहे. शासनाने या संकटावर तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे. एक-दोन वेळचे जेवण वा एकदोन ताडपत्र्यांनी ग्रामस्थांची समस्या सुटणारी नाही. सतत होणाऱ्या नापिकीमुळे पिचलेला शेतकरी आणि पावसाळ्यामध्ये बेरोजगार असलेल्या गावकऱ्यांना तीन-चार महिने कसे जगता येईल, यासाठी शासनाने प्रभावी उपाययोजना करावी, अशी आग्रही मागणी भंडारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रीय कॉंग्रेसचे वयोवृद्ध नेते टोलसिंह पवार यांनी शासनाकडे केली आहे. दरम्यान, श्री पवार यांनी आपदग्रस्त गावकऱ्यांसाठी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देवरीचे तहसीलदार विजय बोरूडे यांचे कडे सोपविली.
गेल्या बुधवारी (दि.15) सायंकाळच्या सुमारास देवरी तालुक्यातील डोंगरगावला वादळाचा तडाखा बसला. यामध्ये गावातील अर्ध्यापेक्षा जास्त घरांचे छत उडाले. शेतातील फळझाडे, पिक, घरातील साहित्य यांची पूर्णतः नासाडी झाली. यामुळे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. परिणामी, ज्याघरांचे छत उडून घरातील अन्नधान्याची नासाडी झाली, त्यांचे पुढे पोटाची खळगी भरण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याची व्यथा टोलसिंह पवार यांनी साप्ताहिक बेरारटाईम्सशी बोलताना व्यक्त केली.
या गावाला अनेक लोकप्रतिनिधींनी भेट दिली आहे. प्रशासन आज सायंकाळ पर्यंत या गावात राहणार आहे. ही चांगली गोष्ट आहे. पण लोकप्रतिनिधींनी केवळ राजकारणापुरते काम केल्याने होणार नाही. प्रशासनाने केलेली जेवणाची व्यवस्था वा केलेली मदत ही गरजूंपर्यंत पोचत नसल्याचे निदर्शनात आले आहे. दोन लिटर रॉकेल, एक वेळचे जेवण वा छोट्याशा 100-150 ताडपत्र्यांनी गावकऱ्यांची समस्या सुटणार नाही. तर हे ग्रामस्थ उरलेले पावसाळ्याचे तीन महिने कसे जीवन जगणार याचा विचार लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने करावा. त्यांना किमान पावसाळ्यात रेशन आणि आवासयोजनेतून घरकूल या प्राथमिक गरजांची पूर्तता कशी करता येईल, याचा विचार शासनाने करून आपादग्रस्तांची मदत करण्याची मागणी श्री पवार यांनी यावेळी बोलताना केली.

आवश्यक आणि शक्य ती सर्व मदत करू- विजय बोरूडे, तहसीलदार देवरी

प्रशासन गुरुवारपासून डोंगरगावात तळ ठोकून आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे तयार करण्यात येत आहेत. या नैसर्गिक आपदेमुळे गावातील 369 घरांपैकी 267 घरे आणि 225 गोठे वादळाच्या तडाख्यामुळे प्रभावीत झाली असून यामध्ये सुमारे 45 लाख 62 हजार 740 रुपयाच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. प्रशासनाच्या वतीने गावातील वीज पुरवठा सुरळीत होईपर्यंत प्रकाशाची सोय म्हणून प्रत्येकी 2 लिटर रॉकेल, 142 ताडपत्र्यांचे वाटप आणि गावकऱ्यांना जेवण आणि नास्त्याची सोय करण्यात आली आहे. मी आपादग्रस्तांना शासनाकडून शक्य होणारी सर्व मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. सुजाण नागरिकांनी या संकटकाळी डोंगरगाववासीयांची मदत करावी, असे कडकडीचे आवाहन सुद्धा श्री बोरुडे यांनी केले आहे. यासाठी सचिव, तलाठी आणि सरपंच यांचे संयुक्त खाते महाराष्ट्र बॅंकेत उघडण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच प्रतिष्ठित नागरिकांची बैठक लावण्यात येणार असल्याचे श्री बोरुडे यांनी सांगितले.

Exit mobile version