गोंदिया,दि.18 : स्थानिक नगर परिषदेच्या स्थायी समितीची सभा बुधवारी (दि.१६) आयोजित करण्यात आली होती. या सभेत एकूण ३२ विषय ठेवण्यात आले होते. अडीेच तास चाललेल्या सभेत स्वच्छता सर्वेक्षण २०१९ अंतर्गत घन कचरा व्यवस्थापनाकरिता युजर चार्जेस शहरवासीयांना द्यावे लागणार आहे. यातंर्गत प्रती घर ४० रुपये, प्रती दुकान ६० रुपये, प्रती रुग्णालय ८० रुपये दर महिन्याला द्यावे लागणार आहे. याची अंमलबजावणी १ जानेवारी २०१९ पासून करण्यात आली आहे. तर ओल्या आणि कोरड्या कचऱ्यासाठी हेच दर राहणार आहेत.
या वेळी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की त्यांना पुरेशा प्रमाणात साहित्य उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यानंतर सदस्यांनी शहरातील वाहतुकीस अडचण ठरणारे विद्युत खांब काढून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करण्याची मागणी केली. या विषयाला मंजुरी देण्यात आली. हे काम नाविण्यपूर्ण योजनेत करण्यात येणार आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला आर्थिक मंजुरी देण्यात आली. शहरात होर्डिंग व बॅनर लावणाऱ्याकडून टॅक्स वसुली करण्यासाठी निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
शहरात चार ठिकाणी ट्राफीक सिग्नल आणि ४० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याकरिता वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरात उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणी टंचाईची समस्या लक्षात घेवून पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरचे दर निश्चित करणे, २० नवीन बोअरवेल तयार करणे आदी विषयांना मंजुरी देण्यात आली. शहरातील बाजारपेठेत महिलांसाठी स्वच्छतागृह तयार करण्याच्या कामाला सभेत मंजुरी देण्यात आली.