Home विदर्भ पेडन्यूज व सोशल मिडियाबाबत समितीने दक्ष राहून काम करावे- डॉ.पार्थ सारथी मिश्रा

पेडन्यूज व सोशल मिडियाबाबत समितीने दक्ष राहून काम करावे- डॉ.पार्थ सारथी मिश्रा

0

गोंदिया, दि.५ :: लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत विविध पक्षांचे उमेदवार हे वृत्तपत्रांमध्ये तसेच इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये पेडन्यूज प्रकारच्या बातम्या छापून आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशाप्रकारच्या बातम्यांमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो. वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये पेडन्यूजप्रकारच्या बातम्या येणार नाही. अशाप्रकारच्या बातम्यांचा संशय आल्यास माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीने तातडीने सभेचे आयोजन करुन योग्य तो निर्णय घेवून दक्षतेने काम करावे. असे निर्देश भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक डॉ.पार्थ सारथी मिश्रा यांनी दिले.
नविन प्रशासकीय इमारतीतील जिल्हा माहिती कार्यालयात लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या प्रसारमाध्यम कक्षाला ४ एप्रिल रोजी डॉ.मिश्रा यांनी भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, स्वीपचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी यांची उपस्थिती होती.
मिडिया मॉनिटरींगच्या माध्यमातून विविध वृत्तवाहिन्या व विविध वृत्तपत्रातील बातम्या आणि जाहिरातीवर लक्ष ठेवण्यात यावे असे सांगून डॉ.मिश्रा म्हणाले, सोशल मिडियावर देखील समितीचे लक्ष असले पाहिजे. सोशल मिडियावर टाकण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या व राजकीय पक्षांच्या जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे परवानगी न घेता सोशल मिडियावर टाकण्यात आलेल्या जाहिरातीबाबत संबंधित उमेदवाराला किंवा राजकीय पक्षाला नोटीस दयावी. सोशल मिडियाच्या माध्यमातून तसेच विविध प्रकारच्या जाहिरातीतून जातीय तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी असे सांगितले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी तथा प्रसारमाध्यम आणि संवाद संदेश वहन समितीचे नोडल अधिकारी विवेक खडसे यांनी प्रसारमाध्यम कक्षातून विविध वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया यावर येणाऱ्या जाहिरातींवर लक्ष ठेवण्यात येत असून यामध्ये उमेदवाराच्या जाहिरातीचा खर्च त्याच्या निवडणूक खर्चात समावेश करण्यात येत आहे. वृत्तपत्रांमध्ये तसेच इलेक्ट्रॉनिक मिडियात येणाऱ्या बातम्यांवर करडी नजर असून यामध्ये पेडन्यूजवर लक्ष ठेवण्यात येत आहे. सोशल मिडियावर पोलिसांच्या सायबर सेलची नजर असल्याचे त्यांनी सांगितले.
माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीच्या माध्यमातून उमेदवार किंवा राजकीय पक्षांना ज्या जाहिराती करावयाच्या आहेत त्याचे पूर्व प्रमाणिकरण या समितीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. तसेच सोशल मिडियावर करण्यात येणाऱ्या जाहिरातीच्या निर्मितीसाठी येणाऱ्या खर्चाचा हिशोब देखील ठेवण्यात येत असल्याचे श्री.खडसे यांनी सांगितले. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी उल्हास नरड उपस्थित होते.

Exit mobile version