Home विदर्भ सरकारकडून व्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी – प्रेमसागर गणवीर

सरकारकडून व्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी – प्रेमसागर गणवीर

0

भंडारा,दि.18ः ९० गावांचे शैक्षणिक, व्यापारिक तसेच सांस्कृतिक केंद्र असलेल्या अड्याळ गावाला तालुक्याचा दर्जा देऊन त्वरित तालुका म्हणुन घोषित करावे अशी मागणी अड्याळ तालुका निर्मिती कृती संघर्ष समितीने केली होती. अनेक वर्षांपासून अड्याळ परिसरातील नागरिकांसह विद्यार्थ्यांना मानसिक त्रास व आर्थिंक भुर्दंड सहन करावा लागत असून परिसरातील गावक-यांवर शासन अन्याय करीत आहे. अनेकवेळा शासनाला निवेदन व स्मरण करूनही शासनाने दखल न घेतल्यामुळे अखेर नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागले. गावकऱ्यांनी शासनाला १५ फेब्रुवारी २०१९ पर्यंत अड्याळला तालुक्याचा दर्जा न दिल्यास होणा-या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सर्व निवडणुकींवर बहिष्कार टाकण्याचा ग्रामपंचायत मध्ये ठराव घेऊन निर्वाणीचा इशारा  कृती संघर्ष समितीने दिला होता. असे असून सुद्धा प्रशासनाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्याउलट लोकसभा निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचा भंग होतो म्हणून ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयांचे फलक लावलेले काढून ग्रामस्थांवर गुन्हे नोंदविण्यात आले. सदर बाब हि लोकशाहीला घातक असून आंदोलन दडपण्याचा प्रकार आहे. सरकारकडून व्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी होत आहे अशी प्रखर टिका भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी केली. त्यांच्या नेतृत्वातील शिष्ट मंडळाने जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन सादर करून सदर ग्रामस्थांवर नोंदविलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी केली आहे. शिष्ट मंडळात भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, महेंद्र निंबार्ते, जिल्हा परिषद सदस्य प्यारेलाल वाघमारे, आणिक जमा पटेल, प्रशांत देशकर, प्रकाश दोनेकर, गणेश लिमजे, मकसूद पटेल, नाहिद परवेझ खान, संजय वरगंटिवार, सचिन फाले, मुकुंद साखरकर, धर्मेंद्र गणवीर, परमेश वलके आदी उपस्थित होते.

Exit mobile version