Home विदर्भ वादळ व पावसाने ११ लाखांचे नुकसान

वादळ व पावसाने ११ लाखांचे नुकसान

0

गोंदिया,दि.04 : जिल्ह्यात गुरूवारी (दि.२) अचानकच आलेल्या वादळ व पावसामुळे जिल्ह्यात ११ लाख एक हजार ५०० रूपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव, देवरी व सालेकसा या तीन तालुक्यांना वादळ व पावसाने झोडपले आहे. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार यात सर्वाधीक नुकसान अर्जुनी-मोरगाव तालुक्यात नोंदविण्यात आले आहे.
सुर्य आग ओकून सर्वांना भाजून सोडत असताना गुरूवारी (दि.२) अचानकच जिल्ह्यात चक्रीवादळ व पावसाने हजेरी लावून चांगलेच झोडपून काढले. या चक्रीवादळ व पावसाने अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील राजोली, भरनोली व गोठणगाव परिसरात कहरच केला. सायंकाळी वादळ वारा व गारपीटीसह बरसलेल्या पावसाने मालमत्तेचे नुकसान केले असतानाच उन्हाळी धानालाही झोडपले. या चक्रीवादळ व पावसाने अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १४५ घर व गोठे पडले असून यात चार लाख ३५ हजार रूपयांचे नुकसान झाल्याची नोंद आहे.  देवरी तालुक्यात वादळी वारा व पावसाने ४३ घरांचे अंशत: नुकसान झाले असून त्याची एक लाख ५६ हजार ५०० रूपये एवढी नोंद करण्यात आली आहे. तर सालेकसा तालुक्यात वादळाने एक घर पूर्णत: पडले असून ३७ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. यात चार लाख १५ हजार रूपयांच्या नुकसानाची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. अशाप्रकारे गुरूवारच्या वादळ व पावसाने जिल्ह्यात ११ लाख एक हजार ५०० रूपयांचे नुकसान झाले आहे.

Exit mobile version