Home विदर्भ वैनगंगेच्या प्रदूषणाची ‘पीएमओ’ने घेतली दखल

वैनगंगेच्या प्रदूषणाची ‘पीएमओ’ने घेतली दखल

0

भंडारा,दि.14-ः जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या वैनगंगा नदीचे पाणी नाग नदीमुळे प्रदूषित झाले आहे. त्यामुळे भंडारा आणि पवनी तालुक्यातील लाखो नागरिकांना दररोज दूषित पाणी प्यावे लागत आहे. वैनगंगा नदीचे पावित्र्य धोक्यात आले असले तरी वैनगंगा बचावसाठी कुणीही पुढाकार घेतला नाही. त्यामुळे येथील ग्रीन हेरिटेज पर्यावरण संस्थेने थेट पंतप्रधान कार्यालयाला ऑनलाईन पोर्टलवर पत्र पाठविले. या पत्राची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने जिल्हा प्रशासनाला योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
नागपूर शहरातील नागनदीमुळे वैनगंगा नदीचे प्रदूषित झाली आहे. त्यामुळे भंडारा शहर व पवनी तालुक्यातील २५ गावातील लाखो नागरिकांना हेच पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम दिसून येत आहेत. नागपूर महानगर पालिकेला केंद्र शासनाकडून नागनदीच्या स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपये मंजूर करण्यात आले असूनसुद्धा काम संथगतीने सुरू आहे. पावसाळा जवळ आल्यावर जून महिन्यात जेसीबी मशिन लावून नदीनाल्याची थातूरमातूर स्वच्छता केली जाते. परंतु, या नागनदीपासून वैनगंगा नदीपर्यंत पूर्णपणे स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे वर्षभर लाखो नागरिकांना गढूळ व अस्वच्छ पाणी प्यावे लागते. नदीच्या दूषित पाण्याने इकार्निया जलचर वनस्पतीने सुद्धा संपूर्ण नदीला कवेत घेतल्यामुळे ऑक्सीजनसुद्धा पाण्याला मिळत नाही.
याकरीता जलसंधारण विभागानेसुद्धा कोणतीच उपाययोजना केलेली नाही. याकरिता केंद्र शासन स्तरावर उपाययोजना करण्यात यावी, असे ग्रीन हेरिटेजच्या पत्रात नमूद करण्यात आले होते. त्यानुसार पीएमओ कार्यालयाने जिल्हा प्रशासनाला आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

Exit mobile version