35.7 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता जिडिसीसीच्या चिचगड शाखेत ७७ लाखांचा घोटाळा;व्यवस्थापकासह पाच कर्मचार्‍यांविरूध्द गुन्हा दाखल

जिडिसीसीच्या चिचगड शाखेत ७७ लाखांचा घोटाळा;व्यवस्थापकासह पाच कर्मचार्‍यांविरूध्द गुन्हा दाखल

0
464

blank

गोंदिया : गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अर्जुनी मोरगाव शाखेत ७ वर्षापूर्वी कोट्यवधीचा घोटाळा उघडकीस आला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच चिचगड शाखेत ७७ लाख ७० हजार ८०० रूपयांचा घोटाळा उघडकीस आला. चौकशी या घोटाळ्यात पदाचा दुरूपयोग करीत कार्यरत व्यवस्थापक, रोखपाल, रोजंदारी कर्मचारी असे एकूण ५ कर्मचार्‍यांनी रकमेची अफरातफर केल्याची बाब समोर आली आहे. हे प्रकरण सन २००८ ते २०१० या आर्थिक वर्षदरम्यानचे आहे. यावरून मुख्य व्यवस्थापकाकडून चिचगड पोलिस ठाण्यात ५ आरोपीविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपींमध्ये शाखा व्यवस्थापक वाय.बी.ठाकूर, रोखपाल दुर्गेश मस्के, वाय.एम.बडोले, डि.पी.देशमुख व रोजंदारी कर्मचारी दुर्गेश रहांगडाले यांचा समावेश आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्याच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाची बँक आहे. या बँकेतून कर्मचारी, सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी व्यवहार करीत असतात. विशेषत: शेतकरी या बँकेत भागीदार आहेत. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकर्‍यांची बँक म्हणून ओळखली जाते. मात्र, बँकेच्या भरवश्यावर कर्मचारी, अधिकारीच डल्ला मारत असल्याचा प्रकार गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दुसर्‍यांदा उघडकीस आला आहे. अर्जुनी मोरगाव येथील बँक शाखेत ७ वर्षापूर्वी कोट्यवधीचा घोटाळा समोर आला होता. हे प्रकरण अद्यापही न्याय प्रविष्ट आहे. त्यातच सन २००८ ते २०१० या आर्थिक वर्षाच्या कालावधीमध्ये देवरी तालुक्यातील चिचगड बँक शाखेत ७७ लाख ७० हजार ८०० रूपयांची अफरातफर झाल्याची बाब समोर आली. या संदर्भात बँकेच्या वतीने चौकशी करण्यात आली. जवळपास दोन ते तीन महिन्याच्या चौकशी दरम्यान तत्कालीन व्यवस्थापक वाय.बी.ठाकूर, रोखपाल दुर्गेश मस्के, वाय.एम.बडोले, डि.पी.देशमुख व रोजंदारी कर्मचारी दुर्गेश रहांगडाले यांनी पदाचा गैरवापर करून बँक प्रशासनाची फसवणूक करीत बनावटी दस्ताऐवजाच्या आधारावर पैशाची अफरातफर केल्याची बाब निष्पन्न झाली. यावरून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य व्यवस्थापक रूपचंद टेटे यांच्या तक्रारीवरून चिचगड पोलिस ठाण्यात पाचही आरोपीविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
………………………
शेतकर्‍यांच्या ठेवीवर मालामाल
शेतकर्‍यांची भागीदारी असलेली बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. या बँकेत जिल्ह्यात जवळपास लाखोहून अधिक शेतकरी भागीदारी सदस्य आहेत. मात्र, शेतकर्‍यांच्या ठेवीवर बँकेचे कर्मचारी चांगलेच मालामाल होत आहेत. विशेष म्हणजे, अलीकडे शेतकरी मालक असलेल्या बँकेत कर्मचारीच शेतकर्‍यांचीच हेळसांड करतात. असाही प्रकार जिल्ह्यातील अनेक शाखेत समोर आला आहे.

blank