
गडचिरोली,(जिमाका)दि.12:केंद्रीय स्तरावरच्या पथकाने आज गडचिरोली जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी पूरस्थितीबाबत पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांना दिलासाही दिला. ही एक नैसर्गिक आपत्ती आहे, यामुळे खचून न जाता तुम्ही जरा धीर धरा. शासनाकडून झालेल्या नुकसानाची तपासणीनंतर निकषाप्रमाणे मदत वेळेवर मिळेल. उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये उभे राहून आलेल्या पथकातील सदस्यांना झालेल्या नुकसानाबाबत व्यथा मांडल्या, यावेळी केंद्रीय पथक त्यांच्याशी संवाद साधत होते. केंद्रीय पथकात सहसचिव, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन तथा पथक प्रमुख रमेशकुमार गंटा, अर्थ मंत्रालयाचे सल्लागार आर बी कौल व तुषार व्यास कार्यकारी अभियंता यांचा समावेश होता. गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले. यामध्ये गडचिरोलीसह आरमोरी, देसाईगंज, चामोर्शी,अहेरी, मुलचेरा व सिरोंचा तालुक्यात शेतकऱ्यांना पुराचा फटका बसला. जिल्ह्यातील पूरस्थितीबाबत आलेल्या पथकाला दौऱ्या अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयात सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील सातही तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणची माहिती छायाचित्रांद्वारे तसेच आकडेवारीच्या माध्यमातून दिली. परिस्थितीची पाहणी करताना मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, प्रभारी जिल्हाधिकारी अनंत वालस्कर, प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी आशिष येरेकर, उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी, तहसीलदार गडचिरोली महेंद्र गणवीर, आरमोरी कल्याणकुमार दहाट व वडसासह संबंधित विभागाचे सर्व विभागप्रमुख, स्थानिक तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहायक यावेळी उपस्थित होते.
केंद्रीय पथकाने गडचिरोली जिल्ह्यातील कनेरी, पारडी, गोगाव, देऊळगाव, ठाणेगाव, हनुमान वार्ड वडसा व सावंगी या ठिकाणी भेट दिली. त्यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवादही साधला. गावागावात शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानाचे तपशील केंद्रीय पथकाला दिले. पथकाने स्थानिकांशी संवाद साधताना तुमच्या घरांचे, जनावरांचे तसेच शेतीमधील पिकांचे, झालेल्या इतर नुकसानीचा मोबदला मिळेल. त्याकरीताच आम्ही येथे आलो असून लवकरच तुम्हाला झालेल्या नुकसानीचे परतफेड शासन करणार आहे. त्याकरीता आपली संपूर्ण माहिती ही ग्रामसेवक, तलाठी तसेच शासन स्तरावरील वरिष्ठ अधिकारी यांना पंचनामा करताना द्यावी, असे त्यांनी सांगितले.
वडसा येथील बायपास रस्त्याचे झालेले नुकसान, तसेच सावंगी गावातील घरांची झालेली पडझड, तसेच महावितरणचे वीज पुरवठा बाबत झालेले नुकसान, शेतीविषयक नुकसान याबाबत त्यांनी सविस्तर पाहणी केली. उपस्थितांनी यावेळी पथकातील सदस्यांना पुरपरिस्थितीबाबत सविस्तर माहिती देताना आम्हाला आता तुम्ही मदत द्या आम्ही निश्चित पुन्हा आलेल्या परिस्थितीवर मात करून पुढे जावू असे सांगितले. सद्या मोठया प्रमाणात ऐन सुगीच्या वेळी आमचे पूरामुळे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी उपस्थितींना सांगितले.
स्थानिक लोकप्रतिनीधींनीही पथकाशी साधला संवाद : जिल्हयातील आमदार कृष्णाजी गजबे, नगराध्यक्षा देसाईगंज शालुताई दंडवते, स्थानिक सभापती, सरपंच यांनी गावस्तरावर उपस्थित राहून पथकातील सदस्यांशी संवाद साधला. जिल्हयातील पूरस्थितीबाबत पथकाला निवेदनातून माहिती सादर केली. जिल्हयातील नागरिकांनी अशा विना पावसाचा पूर कधीही पाहिला नाही तसेच गेल्या २५ वर्षापूर्वीच्या पूरापेक्षा हा पूर जास्त मोठा असून, मोठया प्रमाणात जिल्हयात नुकसान झाले आहे असे ते म्हणाले. याबाबत त्यांनी निवेदनाद्वारे जास्तीत जास्त मदत मिळावी अशी मागणी पथकाकडे केली.
जिल्हयातील पूरपरिस्थिती : गडचिरोली जिल्हयातील वैनगंगा नदिला गेल्या 25 वर्षानंतर सर्वात मोठा पूर आला. यावेळी 30000 कुमेक्सपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग गोसी खुर्द मधून सोडला गेला. दि.28 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान भयानक स्वरूपात पूराचे पाणी नदीकाठी असलेल्या परिसरात शिरले. वैणगंगा नदिने सर्वच ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली. जिल्हयातील अंदाजे 24542 शेतकऱ्यांचे या पूरामूळे 22074 हेक्टर शेतीला नुकसान झाले. यापैकी 3190 शेतकऱ्यांचे व 852 हेक्टर क्षेत्राचे सर्वेक्षण प्रगतीपथावर आहे तर बाकी सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. पूरस्थितीत 16 गावांना मोठया प्रमाणात फटका बसला. 48 तासांपेक्षा जास्त पूराच्या पाण्याचा फटका बसलेल्या 576 कुटुंबांचा यात समावेश आहे. आत्ता तातडीची मदत म्हणून 29 लक्ष रूपये तहसिल कार्यालयाला वितरित करण्यात आले आहेत. त्याचे वितरणही सुरू आहे. या पूरात गडचिरोली तालुक्यात एका मृत्यूची नोंद झाली. तर जिल्ह्यात 7 घरांचे पुर्ण नुकसान, 81 घरांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हयातील बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणी पुरवठा, वीज, शिक्षण व मत्स्य व्यवसाय अशा सर्वांचे मिळून 15847.93 लक्ष रूपयांचे नुकसान झाले आहे असा अंदाज विभागांनी कळविला आहे.