तिरोडा: तालुक्यातील मुंडीकोटा जवळील घाटकुरोडा ते देव्हाडा हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. यामुळे नागरिकांना या रस्त्याने ये-जा करने त्रासदायक ठरत आहे. संबंधित विभागाचे लक्ष देत रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
घाटकुरोडा हे गाव नदी व नाल्याच्या मध्यभागी वसले आहे. त्यामुळे या गावाला पुराला वेढा असतो. यंदा गावात पूर आला होता व त्यामुळे शेतीचे फार नुकसान झाले. अनेक घरांची पडझड झालेली आहे. गावातील मुख्य रस्त्यावर पूर होता व त्यामुळे रस्त्यावरील मुरुम व गिट्टी पुरात वाहून गेली असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. घाटकुरोडा ते देव्हाडा हा रस्ता जीर्ण झाला असून पावसाळ्यात २-३ अपाघत घडले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचून राहत असल्याने खड्डा दिसत नसून अपघात घडतात. या रस्त्याने घाटकुरोडावासी मुंडीकोटा येथे देवाण-घेवाण करण्याकरिता येतात. पण रस्त्याची दुरावस्था झाल्याने त्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालक आपला जीव मुठीत घालून प्रवास करतात. हा रस्ता सरळ देव्हाळा मुख्य रस्त्याला जोडला आहे. त्यामुळे या रस्त्याने दिवसभर वर्दळ असते. मात्र आजघडीला या रस्त्याने पायी चालणे ही कठिण झाले आहे.