आरोग्य यंत्रणेत रिक्त पदांचा भरणा,औषधांचा तुडवडा-परिचारिकेवर रुग्णसेवेची भिस्त

0
331

गोंदिया,दि.24 :राज्यासह जिल्ह्यात कोरोनासंसर्गाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असतानाच आरोग्य विभागातील अनेक रिक्त पदांमुळे अपुèया मानवसंशाधनावर कोरोनाचा रोखथाम करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासोबतच जिल्हा व ग्रामीण रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाता सुरु आहे.त्यातच जिल्हा सामान्य रुग्णालयासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात औषधांचा तुडवडा असून डाॅक्टरांअभावी रुग्णांची भिस्त ही परिचारिकावर अवलबूंन आहे.रेमडेसिव्हीरचे फक्त 40 इंजेक्शन रुग्णालयात उपलब्ध आहेत.ज्याठिकाणी दररोज 150 वर रुग्ण निघत आहेत.त्यातच 23 सप्टेंबरला सर्वाधिक 340 रुग्ण निघाले अशा परिस्थितीत मुळ आजार असलेल्या रुग्णांवर त्या आजाराचेही उपचार केले जात नसल्याने त्यांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे.कोरोनामुळे मृत्यू झालेला आकडा दाखविला जातो मात्र जेव्हा त्या मृताच्या कुटुंबियांना मृतप्रमाणपत्र पाठविले जाते,त्यावेळी मात्र त्यावर कोरोनाचा उल्लेखच राहत नसल्याचेही समोर आले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाहिजे त्याप्रमाणात डाॅक्टरांची नियुक्ती शासनाने केलेली नाही.पुर्णवेळ अधिष्ठाता या 3 वर्षात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मिळालेला नाही.तर बाई गंगाबाई रुग्णालयातही डाॅक्टरांची संख्या कमी असून येथील रक्तपेढीतही रक्तसाठा अत्यल्प असल्याचे चित्र आहे.विविध यंत्र धुळखात बसल्याने खासगी रुग्णालयाची वाट रुग्णांना धरावी लागते.त्याचप्रमाणे जि.प. आरोग्य विभागामध्ये गट अ ची ५ पदे रिक्त आहेत. तर गट ब ची १२ पदे रिक्त आहेत.जिल्ह्यात ४० प्राथमिक आरोग्य केंद्र,२३९ उपकेंद्र,१२ ग्रामिण रुग्णालय,जिल्हा सामान्य कुवंरतिलकसिह रुग्णालय व बाई गंगाबाई महिला रुग्णालय,तिरोडा उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून आरोग्य सेवा दिली जात आहे.यातील तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात आजच्या घडीला सर्वपदे भरलेली आहेत.मात्र इतर ग्रामीण रुग्णालयात अजूनही वैद्यकीय अधिकारी यांची वाणवा आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे लक्ष दिल्यास अतिरिक्त व सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी ही दोन्ही पदे गेल्या अनेक वर्षापासून रिक्त पडली आहेत. विस्तार आरोग्य अधिकारी २,वरिष्ठ सहाय्यक (लिपिक)१२,कनिष्ठ सहाय्यक ४७,वाहनचालक ५,कनिष्ठ लेखाधिकारी ३,वरिष्ठ सहाय्यक(लेखा) ३,कनिष्ठ सहाय्यक (लेखा)१४,औषध निर्माता ६,प्रयोगशाळा तंत्रज्ञ १,आरोग्य पर्यवेक्षक ६,आरोग्य सहाय्यक ११,आरोग्य सेवक(पुरुष)७०,कृष्टरोग तंत्रज्ञ ७,आरोग्य सेविका १५८,आरोग्य सहाय्यक महिला १५ आदी पदे रिक्त पडली आहेत,जी भरण्याकडे प्रशासनाचे पुर्णतःडोळेझाक झालेली आहे.
जिल्ह्यात कोरोनाने सध्या सर्वत्र विक्राळ स्वरुप धारण केले आहे. रुग्णसेवेकरिता डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली. परंतु डॉक्टर वार्डात फिरकत नसल्यामुळे येथे राबत असलेल्या नर्सवरच रुगणसेवेची भिस्त आहे. कोरोना वार्डात डॉक्टर केवळ रुग्णाचा मृत्यू झाल्यास डेथ सर्टिफिकेटवर स्वाक्षरी करण्याकरिता येतात. याशिवाय रुग्णांची फाईल आपल्याकडे बोलावून उपचार सांगून मोकळे होत असल्याची खंत येथे कार्यरत असलेल्या अधिपरिचारिकांनी दिली.
त्यामुळे एवढी भयावह स्थिती असताना देखील शासन आणि जिल्हा प्रशासनाचे लक्ष याकडे का जात नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. देशात आणि राज्यात सुरुवातीच्या काळात कोरोना संक्रमणाचा शिरकाव झाला असताना जिल्हा मात्र कोरोनामुक्त होता. त्यानंतर मात्र जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा झपाट्याने शिरकाव झाला. आजतागायत चार हजारांपेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी अडीच हजारांपेक्षा जास्त कोरोना संक्रमित व्यक्ती उपचार घेऊन घरी परतले. तर ७०० पेक्षा जास्त नागरिक घरी उपचार घेत असून 70 जनांचा कोरोना संक्रमणाने मृत्यू झाला. जिल्ह्याकरिता ही अत्यंत दुखाची बाब आहे.

महाविद्यालयामुळे रुग्णसेवा अधिक बळकट होईल असा समज होता. मात्र त्यापेक्षा उलट झाले. केटीएस रुग्णालय असे वा, बाई गंगाबाई रुग्णालय या रुग्णालयातील रुग्णसेव कमालीची ढेपाळली. यावर वारंवार लोकप्रतनिधी आणि वरिष्ठ अधिकाèयांनी देखील नाराजी व्यक्त केली. रुग्णालयात अत्यावश्यक आणि महागड्या चाचण्या, तपासण्या करण्याची यंत्रसामुग्री लागली. मात्र तांत्रीक बिघाडाचे कारण पुढे करुन नागरिकांना त्य सेवांपासून दूर ठेवण्यात येते. सध्या कोरोना संक्रमणाचा काळ असल्याने नागरिक रुग्णालयात उपचाराकरिता दाखल होतात. मात्र कोरोना वार्डात ज्या रुग्णांना कोरोनाशिवाय दुसरे आजार देखील आहेत अशा रुग्णांकडे दुर्लक्ष होत आहे. निव्वळ कोरोनावर देण्यात येणारा औषधोपचार करुन प्रशासन मोकळे होते. रुग्ण कोरोनाने दगावल्यास डेथ सर्टिफिकेटवर स्वाक्षरी करण्यास डॉक्टर येत असल्याची माहिती रुग्ण आणि तेथे कार्यरत अधिपरिचारिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. हा रुग्णांच्य जीवाशी खेळ नाही तर काय. असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. उल्लेखनीय कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. अशा रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचे सांगून ऑक्सिजन देखील देण्यात येत नाही. खाटा उपलब्ध नसल्याचे सांगून परत पाठविले जात असल्याचा आरोप देखील होऊ लागला आहे.