तिरोडा,दि.24ः-लम्पी या त्वचारोगाचा प्रसार जनावरांमध्ये झपाट्याने होत आहे तसेच हा रोग विषाणूजन्य आजार असल्याने एका जनावरापासून दुसऱ्या जनावराला त्याची लागण होते. या त्वचारोगांमध्ये जनावरांच्या शरीरावर गाठी गाठी येत असून जनावरांचे आरोग्य धोक्यात येते तसेच चारा कमी खाणे, दुधाळ जनावरांनमध्ये दुधाचे प्रमाण कमी होणे यासारखी विविध लक्षणे दिसून येत असल्याने सध्या पशुपालकांसाठी लम्पी आजार हा चिंतेचा विषय बनलेला आहे. त्यामुळे अदानी फाउंडेशन तिरोडा द्वारा अदानी पावर प्रमुख कांती बीश्वास यांच्या नेतृत्वात कामधेनू प्रकल्पाअंतर्गत सहभागी गावांमध्ये लम्पी त्वचारोग लसीकरण मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. यामध्ये आतापर्यंत खैरबोडी, काचेवणी,चिरेखणी, बेरडीपार, गुमाधावडा व गराडा या गावांमध्ये एकूण 1668 जनावरांना लम्पी या रोगाचे लसीकरण करण्यात आलेले आहे. या मोहिमेविषयी अदानी फाउंडेशन चे हेड नितीन शिराळकर यांनी असे सांगितले की या मोहिमेअंतर्गत जवळपास 3000 जनावरांना लसीकरण करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अदानी फाऊंडेशनचे कार्यक्रम अधिकारी मिनेश कटरे यांच्या नेतृत्वात कामधेनू प्रकल्प क्रियान्वयन संस्था बायफचे रुपेश कुकडे , सुमेध बोरकर,मनोज डोमले व गौरीशंकर अंबुले लसीकरण करत आहेत.