
नवी दिल्ला(वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरात दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर हल्ला केला. पुलवामा जिल्ह्यातील पांपोर येथे सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यावर हा हल्ला झाला. यात 2 जवान शहीद झाले असून 3 जण जखमी आहेत. हा हल्ला आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडला. सीआरपीएफच्या 110 व्या बटालियन आणि जम्मू काश्मीरच्या पोलिस दलाचे संयुक्त पथक येथून जात होते. त्याचवेळी दहशतवाद्यांनी मार्ग अडवून अचानक बेछूट गोळीबार केला.
यापूर्वी 27 सप्टेंबर रोजी पुलवामा जिल्ह्यातील अवंतिपोराच्या संबुरा परिसरात चकमक उडाली होती. यात संयुक्त पथकाने 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. तसेच दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक पोलिस कर्मचारी जखमी झाले होते.
गेल्या काही महिन्यांपासून पोलिस आणि लष्करी ताफ्यांवर दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. 16 ऑगस्ट रोजी बारामुलाच्या पट्टन परिसरात सुद्धा सीआरपीएफच्या जवानांना लक्ष्य करून हल्ला करण्यात आला. त्यामध्ये 2 जवान शहीद झाले होते. तर जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात दोन दहशतवादी मारले गेले. तत्पूर्वीही 14 ऑगस्ट आणि 12 ऑगस्ट रोजी जवानांना लक्ष्य करून हल्ले करण्यात आले.





