
वाशिम, दि. 14 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करतांना सर्वसाधारण जनतेकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा निपटारा करणे व योजनेच्या कामात पारदर्शकता राखण्यासाठी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम १९७७ च्या अनुसूची मधील कलम २९ नुसार वाशिम जिल्ह्याकरिता तक्रार निवारण प्राधिकारी (Ombudusman) यांची नेमणूक करावयाची असून इच्छुकांनी आपले अर्ज ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांच्या कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन रोहयोचे उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले आहे.
तक्रार निवारण प्राधिकारी पदासाठी केंद्र शासनाच्या क्र. एल-११०११/२१/२०१२/आरई-VII दि. १६ जानेवारी २०१४ रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत. उमेदवारास लोकप्रशासन, विधी, सामाजिक कार्य, शैक्षणिक किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील किमान दहा वर्षाचा अनुभव असावा. उमेदवार संबंधित जिल्ह्यातील रहिवासी असावा. उमेदवाराचे वय ३१ ऑक्टोबर २०२० रोजी ६८ वर्षापेक्षा जास्त नसावे. तसेच उमेदवार राजकीय पक्षाशी संबंधित नसावा. शारीरिकदृष्ट्या सदृढ तसेच जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात दौरे, निरीक्षण करण्यास सक्षम असावा.
या पदावर नियुक्तीचा कालवधी दोन वर्षाकरिता असेल. तथापि, कामगिरी समाधानकारक नसल्यास नियुक्ती रद्द करण्यात येईल. त्यांचे कार्यालय संबंधित जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असेल. शासन परिपत्रक क्र. २०१३/प्र.क्र. १६५/रोहयो-६अ, दि. १४ ऑगस्ट २०१३ रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तक्रार निवारण प्राधिकारी यांना प्रति बैठक १ हजार रुपये या दराने कमाल प्रति माह २० हजार रुपयेच्या मर्यादेत मानधन देण्यात येईल. तक्रार निवारण प्राधिकारी या पदाची तपशीलवार माहिती, नियुक्तीच्या अटी व शर्ती व अर्जाचा नमुना हा केंद्र शासनाच्या १६ जानेवारी २०१४ रोजीच्या मार्गदर्शक सूचनांद्वारे निश्चित करण्यात आला असून त्याची प्रत केंद्र शासनाच्या www.nrega.nic.in या संकेतस्थळावर तसेच उपजिल्हाधिकारी (रोहयो), वाशिम यांच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे.
इच्छुक उमेदवारांनी स्वतःची शैक्षणिक अर्हता व अनुभवसंबंधीच्या प्रमाणपत्रांसह जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक, वाशिम यांच्या नवे अर्ज तयार करावा. सदर अर्ज ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत उपजिल्हाधिकारी (रोहयो), वाशिम यांच्या कार्यालयात सादर करावा. उशिराने प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. उपजिल्हाधिकारी (रोहयो) कार्यालयात प्राप्त होणाऱ्या अर्जांची २ नोव्हेंबर २०२० रोजी प्राथमिक छाननी करण्यात येईल. ३ नोव्हेंबर २०२० रोजी उमेदवारांची यादी शासनाकडे सादर करण्यात येईल, असे उपजिल्हाधिकारी (रोहयो) कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.




