
देवरी,दि.17:-येथील नगरपंचायत कडून दि.१५ आँक्टोंबरला विविध विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रम पार पडले. त्या कार्यक्रमाला निम्यापेक्षा कमी नगरसेवकांना आमंत्रण दिल्याचा आरोप करीत माजी नगराध्यक्ष सुमन बिसेन यांनी पालकमंत्री व जिल्हाधिका-यांकडे तक्रार केली आहे.
माजी नगराध्यक्ष सुमन बिसेन या सध्या प्रभाग क्र. ८ च्या नगरसेविका असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ६ नगरसेवक भाजपात गेल्याने सध्या देवरी नगरपंचायतमध्ये भाजपाची सत्ता आहे. सुमन बिसेन नगराध्यक्ष असताना कोणत्याही विकास कामाचे भूमिपूजन कार्यक्रम पत्रिका छापून भाजपाचे माजी आमदार संजय पुराम यांच्या हस्ते पार पाडले गेले. देवरी शहरातील विकास कामामध्ये कोणताही पक्ष भेद न करता सर्व प्रतिनिधींना मानसन्मान केला असे आपल्या पत्रात म्हटले आहे.
देवरी शहरातील विविध विकास कामाच्या भूमिपूजन कार्यक्रम मागील महिन्यात घेण्यात येणार होते.सदर कार्यक्रम स्थानिक आमदार सहसराम कोरेटे यांच्या हस्ते घेण्याचे ठरविले होते मात्र ते कार्यक्रम रद्द करण्यात आले. परंतु आमदार विरोधी पक्षाचे असल्याने त्यांनाही बोलावण्यात आले नाही.तसेच नगराध्यक्ष यांच्याकडून पूर्वसूचना न देता दि. १५ ऑक्टोंबरला नगरपंचायत कार्यालय देवरी तर्फे अगदी वेळेवर दुपारी 3.30 वाजेच्या कार्यक्रमासाठी व्हाट्सअप ग्रुपवर सकाळी ११.२६ मिनिटांनी मेसेज टाकून शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रम ४ लोकांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आल्याचे कळले. त्यामुळे सदर कार्यक्रमापासून वंचित रहावे लागले.यात नगरपंचायत प्रशासनाकडून जनप्रतिनिधीचा अपमान करण्यात आल्याचे श्रीमती बिसेन यांनी आरोप पत्राद्वारे केला आहे .
मुख्याधिकारी यांना संबंधित कार्यक्रमाच्या बाबतीत विचारले असता त्यांनी नगराध्यक्ष यांच्या आदेशाने घेण्यात आल्याचे व त्यासंबंधी सूचना व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम अभियंता श्री.झिरपे यांच्याकडून सकाळी ११.२६ मिनिटांनी सर्व नगरसेवकांना देण्यात आले असे सांगितले.