वाशिम, दि. २२ : महिला सशक्तीकरण कायदेविषयक जनजागृती या विषयावर महिलांकरिता मार्गदर्शन शिबीर २१ ऑक्टोबर रोजी वाशिम नगरपरिषद येथे संपन्न झाले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधिज्ञ संघ यांच्यावतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी. पी. देशपांडे, जिल्हा विधिज्ञ संघाच्या अध्यक्ष श्रीमती अॅड. सी. एन. मवाळ, अॅड. प्रतिभा वैरागडे, अॅड. उषा भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.अॅड. मवाळ म्हणाल्या, महिलांविषयी विविध कायदे आहेत, मात्र या कायद्यांची पुरेशी माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे महिला विषयक कायद्यांबाबत व्यापक जनजागृती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
अॅड. वैरागडे यांनी कामाच्या ठिकाणी होणारे महिलांचे शोषण, अत्याचार याविषयी असलेल्या कायद्यांची माहिती यावेळी उपस्थितांना दिली, तसेच अॅड. भागत यांनी मातृत्व लाभ कायदा या विषयावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधी सेवा प्राधिकरणचे सचिव श्री. देशपांडे यांनी केले, तर आभार सामाजिक कार्यकर्त्या वनमाला पेंढारकर यांनी मानले. यावेळी विविध कार्यालयातील महिला शिबिरासाठी उपस्थित होत्या.