रत्नागिरी, दि. 29 : रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील मौजे कोचरी डाफळेवाडी तसेच राजापूर तालुक्यातील चिखलगाव, वरचीवाडी, जड्यारवाडी प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळणेबाबत आणि राजापूर, लांजा तालुक्यांतील विविध प्रकल्पांचा मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सविस्तर आढावा घेतला.
रत्नागिरी जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या प्रश्नांविषयी मंत्रालयात मंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी आमदार डॉ. राजन साळवी, प्रधान सचिव नंद कुमार, अधीक्षक अभियंता श्री खांडेकर, श्री देवराज यांच्यासह उपसचिव व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. गडाख म्हणाले, राजापूर तालुक्यातील चिखलगाव, वरचीवाडी, जड्यारवाडी प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. Social Impact Assessment लवकर करुन पोहोच रस्त्याबाबत तांत्रिक अहवाल तातडीने सादर करण्यात यावा. तसेच राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदारसंघातील विविध प्रकल्पांचा आढावा घेऊन सर्वच प्रकल्प निधी उपलब्धतेप्रमाणे पूर्ण करण्यात येतील.
कोचरी गावातील ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघणार
मंत्री श्री. गडाख म्हणाले, लघु पाटबंधारे योजना कोचरी गावाच्या पश्चिमेस ०.५० कि.मी. अंतरावर स्थानिक नाल्यावर प्रस्तावित आहे. या धरणाधी लांबी ३९२.०० मी. व सांडव्याची लांबी २७.०० मीटर आहे. लघु पाटबंधारे योजना कोचरीमुळे येथील १०५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. सदर योजनेस १५६४.०० स.घ.मी. इतक्या पाणी वापरास पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे. सदर पाणीसाठ्यापैकी २२.७५ स.घ.मी. इतका पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आला असल्याने सदर गावातील ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरुपी निकाली निघणार आहे.
सद्यस्थितीत मृद व जलसंधारण विभागाची सन २०१८-१९ ची दरसूची अंमलात आल्याने सदर अंदाजपत्रक अद्ययावत करुन मंजुरीसाठी फेरसादर करण्याची कार्यवाही प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.