
गडचिरोली,दि.30ः नक्षलवाद्यांच्या कृत्यामुळे बेरोजगारीचे संकट ओढविलेल्या जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील १४0 बेरोजगार युवकांना हैदराबादसारख्या शहरात सुरक्षा रक्षकाची नोकरी लावून देण्यासाठी पोलिस विभागाने पुढाकार घेतला आहे. पोलिसांच्या या उपक्रमामुळे त्या युवकांच्या जसीनाला वेगळीच कलाटणी मिळणार असून दुर्गम भागातील नागरिकांना आर्थिक विकासाचा नवीन आशेचा किरण दिसणार आहे.
शनिवार २८ नोव्हेंबर रोजी पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलिस दल व हैद्राबाद येथील कंपनीच्यावतीने रोजगार मेळावा घेऊन नोकरीप्राप्त उमेदवारांना नियुक्ती प्रमाणपत्र वाटप करून त्यांचा सत्कार कार्यक्रम पोलिस मुख्यालयाच्या सभागृहात पार पाडला. यावेळी अपर पोलिस अधीक्षक मनिष कलवानीया, अपर पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक समय्या मुंडे, हैद्राबाद कंपनीचे संचालक मल्लेश यादव उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली पोलिस दलाने रोजगार मेळावा अँप तयार केला असून या अँपच्या माध्यमातून अनेक बेरोजगार तरूणांनी पोलिस दलाकडे नावनोंदणी केली आहे. गडचिरोली पोलिस दलाच्या पुढाकाराने उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय जिमलगट्टा, कुरखेडा, पेंढरी, अहेरी, गडचिरोली अंतर्गत येत असलेल्या अतिदुर्गम भागातील १४0 बेरोजगार तरूणांना हैद्राबाद येथे सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पोलिस दलाच्या या उपक्रमामुळे अतिदुर्गम भागातील तरूणांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून रोजगार मिळालेल्या १४0 तरूणांनी व त्यांच्या कुटुंबियांनी पोलिस दलाचे आभार मानले आहे.
रोजगार प्राप्त उमेदवारांचे पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांनी कौतुक केले असतन त्यांच्या उज्वल भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपविभागीय पोलिस अधिकारी जिमलगट्टा, कुरखेडा, पेंढरी, अहेरी, गडचिरोली व या उपविभागातील पोलिस स्टेशनचे सर्व प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेतील अधिकारी व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.





