
चंद्रपूर : आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.नैराश्याच्या भरात वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ, ज्येष्ठ समाजसेवक स्व. बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आमटे ह्यांच्या कन्या डॉ. शीतल आमटे – करजगी यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद पेरणाऱ्या आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरले आहे.
शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला. या सर्व वादाच्या केंद्रस्थानी शीतल होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला. हा अंतर्गत गृहकलह सुरू असतानाच आज त्यांच्या आत्महत्येचे वृत्त आले. त्या मानसिक तणावात असल्याचे काही दिवसांपूर्वीच त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले होते हे विशेष.





