40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Top News गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढणार?

गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढणार?

झंवर यांच्या कार्यालयात लेटरपॅडसह कागदपत्रे आढळली

0
315

blank

जळगाव (प्रतिनिधी) : बीएचआर क्रेडीट सोसायटीमधील अवसायकाच्या काळातील गैरव्यवहाराच्या गुन्ह्यातील संशयित उद्योजक सुनील झंवर याच्या खान्देश काम्प्लेक्समधील कार्यालयात माजी मंत्री महाजन यांच्या लेटरपॅडसह कागदपत्र सापडल्याचे वृत्त आहे. तसेच याच कार्यालयातून महापालिकेचा स्वच्छतेचा मक्ता असलेल्या वाटरग्रेस कंपनीची कागदपत्रे तसेच मक्तेदाराच्या कर्मचा-यांची एटीएम कार्ड मिळाल्याची माहिती आहे.

दरम्यान, गुन्ह्यातील संशयित सुनिल झंवर, अवसायक जितेंद्र कंडारे यांच्यासह सहा जणांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान या संदर्भात गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क केला असता, तो होवू शकला नाही.

शहरातील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी-स्टेट को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीत अवसायकाच्या काळात झालेल्या गैरव्यवहाराच्या पुणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकून चौकशीला सुरुवात केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या पथकाकडून करून सुरू करण्यात आलेली तपासणी आज तिस-या दिवशी देखील सुरू होती. या प्रकरणी उद्योजक माजी मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय सुनील झंवर यांच्या गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव शहरातील खान्देश कॉम्प्लेक्समधील सुनील झंवर यांचे रमेश ड्रायव्हिंग स्कूलच्या कार्यालयात तपासणी सुरु केली. याठिकाणी पोलिसांना महापालिकेचा स्वच्छतेचा मक्ता घेतलेल्या वॉटरग्रेस कंपनीची कागदपत्रे तसेच कर्मचा-यांचे एटीएम कार्ड सापडल्याचे समजते. यासह माजी मंत्री गिरीश महाजन यांचे लेटर पॅड सापडल्याची जोरदार चर्चा असल्याने या प्रकरणाचे धागेदोरे महाजनांपर्यंत जावून पोहचतात की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकारी यांनी कागदपत्रे हस्तगत केली आहेत. मात्र, ती कुणाशी संबधित आहेत, ते आताच सांगता येणार नसल्याची माहती दिली आहे.

blank