33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home मराठवाडा/खान्देश शेगुडजवळ बिबटय़ाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू

शेगुडजवळ बिबटय़ाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू

0
227

blank

कर्जत :  कर्जत तालुक्यातील शेगुड जवळ करमाळा तालुक्यातील  कुंदेवाडी येथील एका पस्तीस वर्षीय तरुणावर बिबटय़ाने काल रात्री साडेआठ ते नऊचे सुमारास हल्ला केला असून त्यास ओढत जवळच्या शेतात नेले, या युवकांचे रक्त एका जागी आढळले असून त्यानंतर त्याचा मृतदेहही आढळला. यामुळे शेगुड परिसरात  खळबळ उडाली आहे.     पाथर्डीत तीन मुलांचे बिबटय़ाने बळी घेतले असून यापूर्वी पाथर्डीत चार बिबटे पकडण्यात आले. बिबटय़ांचा धुमाकूळ आता इतर तालुक्यात सुरू आहे. बीड जिल्ह्य़ात आष्टीत बिबटय़ाने तीन बळी घेतले आहेत. पाथर्डीतील बिबटे आष्टी, करमाळा मार्गाने आता कर्जतमध्ये गेले आहेत.

या पार्श्वभूमीवर आज भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर यांनी त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली व सर्व ग्रामस्थांना  दिलासा   देताना कोणीही घाबरून जाऊ नये, आम्ही सर्व जण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे सांगितले.त्यांनी या वेळी वन विभागाचे अधिकारी छबिल वाढ यांच्यासोबत चर्चा केली व  पिकांना पाणी देण्यासाठी दिवसा वीज पुरवावी, त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी अंधारात पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागणार नाही, स्वत:चा जीवही धोक्यात घालावा लागणार नाही असे सांगितले.

कर्जत तालुक्यातील शेगुळ गावाजवळील करमाळा तालुक्यातील कुंदेवाडी येथे कल्याण (वय ३५) हा आपल्या शेतात गेला असताना अचानक बिबटय़ाने हल्ला केला व त्याच्या गळ्याला पकडून त्यास ओढत जवळच्या शेतात नेले. काही वेळाने  सदर व्यक्तीचा मृतदेह आढळला असून या बिबटय़ाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

तालुक्याच्या हद्दीत बिबटय़ाने प्रवेश केल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या वेळी शेतकऱ्यांनी, सध्या पिकांना पाणी देण्यासाठी रात्री शेतामध्ये जावे लागते यामुळे तर असे हल्ले होऊ लागले तर जीव धोक्यात येत आहे आणि आम्ही घाबरून गेलो आहोत, त्यामुळे वीज पुरवठा शेतीसाठी दिवसा करावा अशी मागणी केली. यावर खेडकर यांनी तातडीने कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व या परिसरामध्ये बिबटय़ाची दहशत असल्यामुळे दिवसा शेतीसाठी वीज पुरवठा करावा कारण सध्या पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. जर पाणी दिले नाही तर पिके जळून जातील आणि बिबटय़ाने हल्ला केला तर शेतकऱ्यांचा जीव जाईल त्यामुळे याबाबत तातडीने गांभीर्याने विचार करून तत्काळ शेतीसाठी दिवसात पूर्ण दाबाने वीज  सोडावी अशी मागणी केली आहे.

विजयदीप जगताप यांनी कर्जत- करमाळा रस्त्यावर राधेश्याम मंगल कार्यालयाजवळ बिबटय़ा स्वत: पाहिला असल्याची माहिती दिली आहे.

blank