
भंडाराृ—कारधा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोका जंगलातील नवेगाव शिवारात एका अज्ञात इसमाचा कुजलेला मृतदेह १ डिसेंबर रोजी आढळून आला होता. तपासाअंती सोन्याचा गोप व अंगठय़ांच्या लालसेपोटी त्याच्या मित्रांनीच त्याचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव यांनी कारधा पोलिस ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. याप्रकरणी तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दयाराम पुंडलिक टिचकुले (५0) रा. सोमलवाडा ता. लाखनी असे मृतकाचे नाव असून योगेश तितीरमारे, संजय काटगाये, नरेंद्र पुळके सर्व रा.रेंगेपार/कोठा अशी आरोपींची नावे आहेत. मृतक आणि आरोपी हे चांगले मित्र होते.
२६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास दयाराम टिचकुले हा त्याचे मित्र योगेश तितीरमारे, संजय काटगाये, नरेंद्र पुळके सर्व रा.रेंगेपार/कोठा यांच्यासोबत ओमनी व्हॅन क्र . एमएच ४0/एसी ४११३ ने पार्टी करण्याच्या उद्देशाने सोमलवाडावरुन निघाले होते. ते सोबत जात असताना गावातील काही लोकांना त्यांना बघितले होते. त्यावरुन पोलिसांनी योगेश तितीरमारे, संजय काटगाये व नरेंद्र पुळके यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता सर्वांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. २६ नोव्हेंबर रोजी तिनही आरोपी हे ओमनी व्हॅनने कोका जंगलातील सोनेगाव चौकी येथून दुपारी ३ वाजताच्या सुमारास गेले होते. त्यांच्या नावानीशी त्यांच्या वाहनांची नोंद व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी हस्तगत केले. त्यानंतर त्यांना पोलिसी हिसका दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या १२ तासात कारधा पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला.
याप्रकरणी कारधा पोलिसांनी तिनही आरोपींना अटक करुन त्यांच्यावर भादंवि कलम ३0२, २0१, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. तपास कारधाचे ठाणेदार दिपक वानखेडे करीत आहेत.
या घटनेचा तपास पोलिस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी टिकाराम काटे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार दिपक वानखेडे, पोलिस उपनिरीक्षक माधव परशुरामकर, रविंद्र रेवतकर, पोलिस हवालदार गिरीश बोरकर, विवेक रणदिवे, आकाश सोनुने, कांतिश कराडे यांनी केला.





