
मुंबई, दि ६ : दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त सागराशी स्पर्धा करणारा भीमसागर येथे येतो. परंतु कोरोनामुळे वेगळी परिस्थिती आहे. त्यामुळे भीमसैनिकांनी आपल्या शिस्तीचे व संयमाचे दर्शन घडविले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चैत्यभूमी येथे अभिवादन करताना केले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले तसेच खासदार शरद पवार यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, भारतरत्न डॉ .बाबासाहेबांच्या दूरदृष्टीपणाला आणि एकूणच त्यांच्या कार्याला मी विनम्रपणे अभिवादन करतो आणि सर्वांनी शिस्तीचे पालन केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.
यावेळी राज्यपाल म्हणाले, कोरोनामुळे सर्व जग त्रस्त आहे, सगळ्या जगात भारतापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होत आहे आणि भारतात त्या मानाने मृत्यू संख्या कमी आहे याचे कारण एकच आहे की, भगवान बुद्धांनी करुणा, दयेचा जो विचार लोकांना दिला हाच विचार बाबासाहेबांनी स्वीकारला, आणि याच विचारांच्या आधाराने आपण कोरोनाला हरवू शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या श्रमाने आणि बलिदानाने पुन्हा एकदा आपला देश नवे शिखर गाठेल, सर्वजणांनी एकत्र येऊन बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करू, आज संपूर्ण देश त्यांना अभिवादन करीत आहे. माझे ही त्यांना विनम्र अभिवादन.

यावेळी श्री अजित पवार म्हणाले राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक विविधता असलेल्या आपल्या देशाला एकसंघ, एकजूट, सार्वभौम ठेवण्याचं संपूर्ण श्रेय भारतीय राज्यघटनेला आणि बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला आहे. एक शक्तिमान देश म्हणून भारताची ओळख जगात व्हावी हे बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध होवू या. त्याचबरोबर इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत .
तसेच यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी ही आपले मनोगत व्यक्त करून अभिवादन केले. या अभिवादन कार्यक्रमाला मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, मुबंईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त इकबाल चहल आदी उपस्थित होते.
महापरिनिर्वाणदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
मुंबई, दि. ६ :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मुंबईतील दादर येथे चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले.डॉ. बाबासाहेबांनी दिलेला एकता, समता, बंधुता, सर्वधर्मसमभावाचा विचारच देशाला व समाजाला पुढे घेऊन जाणार आहे. या विचारांवर चालण्याचा आपण सर्वांनी पुनर्निर्धार करुया, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त त्यांच्या कार्याचं, विचारांचं स्मरण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला ‘शिका आणि संघटीत व्हा’ अशी शिकवण दिली. समाजातील प्रत्येक व्यक्तीला मान, सन्मान, न्याय, व्यक्ती-अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मतदानाचा हक्क व समानतेची वागणूक देणारी राज्यघटना दिली. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक विविधता असलेल्या आपल्या देशाला एकसंध, एकजूट, सार्वभौम ठेवण्याचं संपूर्ण श्रेय भारतीय राज्यघटनेला आणि बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.
डॉ. बाबासाहेबांनी दिलेली राज्यघटना व राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचं संरक्षण करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य असून त्यासाठी सर्वांनी दृढसंकल्प होऊया, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. चैत्यभूमीवर दरवर्षी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या बंधू-भगिनींनाही उपमुख्यमंत्र्यांनी वंदन केले आहे. कोरोना संकटामुळे यंदा या अनेकांनी आपापल्या घरुनंच डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केल्याबद्दल त्यांचेही उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधानभवनात आदरांजली
मुंबई, दि. ६ : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधान भवनाच्या प्रांगणात असलेल्या त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

याप्रसंगी विधानमंडळाचे सचिव राजेन्द्र भागवत, उप सचिव विलास आठवले, अवर सचिव रविंद्र जगदाळे, सभापतींचे सचिव महेंद्र काज आदिंसह विधानभवनातील अधिकारी व कर्मचा-यांनीही गुलाबपुष्प अर्पण करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची समतेची शिकवण मानवजातीला प्रेरणादायी – राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम
पुणे, दि. ६ :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची समतेची शिकवण मानवजातीला आजही आदर्श व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी त्यांनी आज स्टेशन परिसरातील त्यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळुंकी, अतिरिक्त आयुक्त दिलीप डोके तसेच अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी राज्यमंत्री कदम यांनी येथे उपस्थित असलेल्या सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व कलाकारांबरोबर चर्चा केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित राज्यघटनेमुळेच देश एकसंघ – पालकमंत्री छगन भुजबळ
नाशिक, ६ डिसेंबर,: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर युगपुरुष असून सगळ्या जगात त्यांना मान्यता आहे. बाबासाहेब आंबेडकर लिखित राज्यघटनेने देश एकसंघ असून देशात आजही लोकशाही टिकून असल्याचे मत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील शालीमार येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी विनम्र अभिवादन केले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, नगरसेविका सुषमा पगारे, कोंडाजीमामा आव्हाड, नानासाहेब महाले, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषेदेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, दिलीप खैरे, संतोष सोनपसारे, अनिता भामरे, अंबादास खैरे, नगरसेवक जगदीश पवार उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, जगातील अनेक विद्यापीठांमध्ये बाबासाहेबांच्या नावाची दालने आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले भारताचे संविधान अनेक देशांना घटना लिहिण्यास मार्गदर्शक आहे. आजही अनेक देश भारताच्या संविधनाचा अभ्यास करुन त्यांच्या देशाची घटना तयार करत असल्याचे यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.





