
वाशिम, दि. १५ : राज्यात १२ आणि १३ डिसेंबर २०२० रोजी राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर महारोजगार मेळाव्याला आता २० डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मेळाव्यात राज्यातील विविध खाजगी कंपन्यांमध्ये सुमारे ६५ ते ७० हजार रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
लॉकडाऊनमुळे राज्यातील उद्योग-व्यवसायांवर विपरीत परिणाम झाला होता. परंतु, सद्यस्थितीत हे उद्योग-व्यवसाय पूर्ववत होत आहेत. या उद्योग-व्यवसायांमधील रोजगाराच्या संधी बेरोजगार उमेदवारांना उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्यावतीने www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर १२ आणि १३ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्याला आता २० डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
महारोजगार मेळाव्यात वाशिम जिल्ह्यासह राज्यातील विविध उद्योग, व्यवसाय यांच्याकडे इयत्ता नववी उत्तीर्ण पासून ते दहावी, बारावी, आय.टी.आय., डिप्लोमा, कोणत्याही विषयातील पदवी तसेच पदव्युत्तर पदवी याचबरोबर सर्वशाखीय बी.ई. आणि इतर व्यावसयिक शैक्षणिक पात्रतेची किमान ६५ ते ७० हजार रिक्तपदे भरण्याचे नियोजित आहे. तरी वाशिम जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींनी २० डिसेंबर २०२० पर्यंत वेबपोर्टलवर पसंतीक्रम नोंदवून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाशिम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुनंदा बजाज यांनी केले आहे.
वाशिम जिल्ह्यातील विविध उद्योग-व्यवसायामधील सुमारे ५०० रिक्तपदांची भरती होणार आहे. त्यात प्रामुख्याने वाशिम येथील इम्पॉवरप्रगती व्होकेशनल अँड स्टॉफींग प्रा. लि., मिडास इंटेरिअर अँड एक्सेटीअर प्रा.लि., फ्युचर मनी सोर्स इंडिया प्रा. लि., औरंगाबाद येथील परम स्किल्स ट्रेनिंग प्रा. लि., श्री. सेवा कॉम्प्युटर्स आदी उद्योग-व्यवसायांचा समावेश आहे.
उमेदवारांनी संकेतस्थळावर निवडलेल्या पसंतीक्रमानुसार आणि उद्योजकांच्या सोयीनुसार त्यांचे मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ उमेदवारांना एस.एम.एस., दूरध्वनी, ई-मेल किंवा उद्योजकांच्या सोयीच्या माध्यमाद्वारे कळविण्यात येणार आहे. त्यानंतर ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतीचे आयोजन संबंधित उद्योजकांकडून करण्यात येईल.
इच्छुक युवक-युवतींनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. होम पेजवरील नोकरीसाधक (Job Seekar) लॉगीनमधून आपापल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगीन करावे. त्यानंतर डाव्या बाजूला ‘डॅशबोर्ड’ मधील ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर’या बटनावर क्लिक करुन आपला जिल्हा निवडून त्यातील ‘स्टेट लेव्हल मेगा जॉब फेअर’ (STATE LEVEL MEGA JOB FAIR) या रोजगार मेळाव्याची निवड करावी. त्यानंतर आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदाखाली दिसणाऱ्या ‘अप्लाय’ (Apply) बटणावर क्लिक करावे. हिरव्या रंगात ‘सक्सेसफुल’ चा मेसेज दिसेल. या पद्धतीने आपण महारोजगार मेळाव्यात सहभागी झाला, असे समजावे.




