
गोंदिया : राज्यात सुगंधित तंबाखू प्रतिबंधित असतानाही शहरात मोठ्या प्रमाणात याची विक्री होत आहे. अन्न व औषधी विभागाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून तब्बल 5 लाख 88 हजार 70 रुपये किंमतीची प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त केली आहे.
अन्न व औषधी प्रशासनाने सावराटोली येथील चूडामण चौकातील सिंधी शाळेजवळील गोदामावर धाड मारून पहिली कारवाई केली. यात प्रीमियम क्वालिटी एमके टोबॅको, रिमझिम टोबॅको, दबंग टोबॅको, पान बहार मसाला याचा समावेश आहे. मालाचे एकूण वजन 591.6 किलो असून किंमत 2 लाख 68 हजार 550 रुपये आहे. अन्न सुरक्षा अधिकारी पीयूष मानवटकर यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अन्न सुरक्षा कायद्याच्या कलम 3 1 झेड झेड 3, सहकलम 26 2, कलम 2 1, 26, 24, 27, 3 ई, 30 2 ए, तथा अन्य सुरक्षा कायदा 2011 च्या कलम 3 व 4 तथा भादंविच्या कलम 188, 272, 273, 328 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक मोरे करीत आहेत.
दुसरी कारवाई शंकर चौकातील रहिवासी 38 वर्षीय आरोपीच्या गौतम नगरातील गोदामावर धाड मारून करण्यात आली. यात 2 लाख 39 हजार 520 रुपये किंमतीची सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली. यात अन्न व संरक्षण अधिकारी गोपाल नंदनवार यांच्या तक्रारीवरून अन्न सुरक्षा कायद्याच्या कलम 3 1 झेड 3, सहकलम 26 2, कलम 2 1, 26, 24, 27,3 ई,30 2 ए, तथा अन्य सुरक्षा कायदा 2011 च्या कलम 3 व 4 तथा भादंविच्या कलम 188, 272, 273, 328 अन्वये शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपस सहायक पोलीस निरीक्षक सपाटे करीत आहेत.




