
गोंदिया,दि.8 : कोरोना प्रतिबंधक लसीच्या आपत्कालीन वापरासाठी बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय गोंदिया, ग्रामीण रुग्णालय रजेगाव व प्राथमिक आरोग्य केंद्र खमारी येथे आज 8 जानेवारी रोजी कोविड-19 लसीकरणाची रंगीत तालीम (ड्राय रन) घेण्यात आली. जिल्ह्यातील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय गोंदिया, ग्रामीण रुग्णालय रजेगाव व प्राथमिक आरोग्य केंद्र खमारी येथे प्रत्येकी 25 अशा एकूण 75 लाभार्थ्यांचा समावेश आहे. रंगीत तालीममध्ये लस न देता लसीकरणासाठीची संपूर्ण प्रक्रिया राबविली आहे.
लसीकरणासाठी पहिल्या टप्प्यात 8 हजार 636 हेल्थ केअर वर्करला लस दिली जाणार आहे. लाभार्थ्यांची को-वीन ॲपवर नोंदणी झाली आहे. शासकीयसह खाजगी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांचा यात समावेश असणार आहे. लसीकरणाची पुर्वतयारी म्हणून बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय गोंदिया, ग्रामीण रुग्णालय रजेगाव व प्राथमिक आरोग्य केंद्र खमारी येथील आरोग्य केंद्रात ड्राय रन करण्यात आले. ड्राय रन मधील लाभार्थ्यांची ओळख पटविण्यासाठी पोर्टलवर त्यांची माहिती अपलोड करणे, लस दिल्यानंतरची नोंद घेणे व पुढील 30 मिनिटे आरोग्य कक्षात निरीक्षण करणे अशी रंगीत तालीम करण्यात आली.
कोरोना लस घेतल्यानंतर ही लस आपले कोरोना आजारापासून संरक्षण करेल. लस घेतल्यानंतर कोरोना आजारापासून सुरक्षीत राहण्यासाठी मास्क लावणे, वारंवार हात धुणे आणि सहा फुटाचे शारिरीक अंतर ठेवणे बंधनकारक असेल. लसीकरणानंतर आपणास काही त्रास जाणवल्यास आपण ए.एन.एम., आशा कार्यकर्ती, जवळचे आरोग्य केंद्र किंवा कोरोना कंट्रोल रुमशी संपर्क साधावा.
कोविड-19 च्या लसीकरणाची रंगीत तालीम जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत करण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.नरेश तिरपुडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.संजय पांचाळ उपस्थित होते.
00000




