32.7 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ रुग्णवाहिकाचालकासह सुरक्षा रक्षकांच्या शौर्याला सलाम: सात चिमूकल्यांचे वाचविले प्राण

रुग्णवाहिकाचालकासह सुरक्षा रक्षकांच्या शौर्याला सलाम: सात चिमूकल्यांचे वाचविले प्राण

0
87

भंडारा,दि.09ः-येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात अतिदक्षता कक्षात शनिवारच्या मध्यरात्री सुमारे दोन वाजे लागलेल्या आगीने 10 नवजात बाळांचा जीव घेतला.त्यांना झोपेत मिटलेले डोळे सकाळी उघडण्याची संधीच या घटनेने हिरावून घेतली.त्याचवेळी त्याचठिकाणच्या 7 नवजातबाळांचे जिव मात्र रुग्णवाहिकेच्या चालकासंह सुरक्षा रक्षकांनी आपले सर्वस्वपणाला लावून वाचविल्याने त्यांच्या या शौर्याची सर्वत्र प्रशंसा केली जात असून ते या बाळांच्या जिवनाचे जिवनदातेच ठरले आहेत.या युवकांनी वेळीच घटनेचे गांभीर्य ओळखले नसते तर परिस्थिती अजूनही भयावह झाली असती.

नवजात अति दक्षता (SNCU- Severe Neonatal Care Unit) कक्षाने रात्री साडेबाराच्या दरम्यान पेट घेतला असेल. कक्षातून धूर येताना पाहून रात्रपाळीत ड्यूटीवर असलेले रक्षक गौरव रहपाडे आणि शिवम मडावी यांनी राहुल गुप्ता व राजकुमार दहेकर या रुग्णवाहिका चालकांना मदतीसाठी फोन केला,तेव्हा दीड वाजून गेलेले होते.तत्काळ चारही युवक पहिल्या माळ्यावर असलेल्या अति दक्षता कक्षात पोहोचले.

राहुल गुप्ता या युवकांने सांगितले की,दार उघडून आत जाण्याचा प्रयत्न केला असता कक्षात सगळीकडे धूर होता. आग आणि काळ्या धूराशिवाय काहीही दिसत नव्हते. ऑक्सिजन सिलिंडर असलेल्या भागात आग वाढलेली दिसत होती. स्फोट होत असल्याचा आवाज, उडत असलेले काचाचे तुकडे व जमिनीवरील फुटलेल्या टाईल्सने कक्षाच्या आत जाता येत नव्हतं. रुग्णालय स्टाफ,परिचारिकांच्या मदतीने आत जाण्याचा प्रयत्न केला पण अपयश आले. इतक्यात अग्निशमन दल तिथे पोहोचले. सगळे इमारतीच्या बाहेर आले व अग्निशमन दलाच्या पायऱ्यांचा वापर करून इमारतीच्या मागच्या भागात असलेल्या दाराला पायऱ्या टेकवून आत प्रवेश केला. आत जाण्यासाठी कक्षाचे मागचे दार फोडावे लागले.सोबत असलेल्या राजकुमार दहेकरने सांगितले की कक्षात इन बोर्न (In Born) म्हणजेच सामान्य रुग्णालयात जन्म झालेले एका बाजूला तर आउट बोर्न (Out Born) म्हणजेच जिल्ह्यातील इतर शासकीय रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रातून आलेले नवजात बाळ ठेवलेले होते. इन बोर्न कक्षात असलेल्या सर्व सातही बाळांना बाहेर काढण्यात यश आले. पण आउट बोर्न मधील बाळांच्या भागात ठेवलेल्या उपकरणांनी पेट घेतलेला होता. त्या भागात आगीमुळे जाता आले नाही. त्यात दोन बाळांनी सुद्धा पेट घेतलेला होता.धूर इतका तीव्र होता की आम्हाला सुद्धा सहन होत नव्हते. आमच्याकडे आग विझवण्याचे साधन असते तर कदाचित आम्ही कक्षातील आग आटोक्यात आणली असती.

विज निरीक्षक अधिकारी आणि फायर कॉलेजचे तज्ञ मंडळी घटनास्थळी पोहोचून आगीच्या कारणांचा शोध घेत आहेत. प्राथमिक माहितीनुसार वातानुकूलित यंत्राजवळ ठेवलेल्या बाळाच्या यंत्रात झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज आहे.सात चिमुकल्या बाळांचे प्राण वाचविणारे हे सर्व युवक हे नेहमीच चोवीस तास सामान्य रुग्णालय परिसरात असतात.ते जर नसते तर त्या सात बालकांचेही जिव वाचले नसते त्यांच्या या धाडसाने या चिमुकल्यांना तरी जिवदान मिळाले असून या चिमुकल्यांसाठी ते मसिहाच ठरले आहेत.