वाशिम, दि. ११ : महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे १ जानेवारी २०२१ रोजी मालेगाव तालुक्यातील अमानी येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात आला. या बालविवाहाबाबतची गोपनीय माहिती महिला व बाल विकास विभागाला प्राप्त झाली होती. तत्पूर्वी ३० डिसेंबर रोजी मुंगळा येथील बालविवाह रोखण्यात विभागाला यश आले होते.
बालविवाहाबाबतची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांनी जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या संरक्षण अधिकारी कु. लक्ष्मी एस. काळे, कायदा तथा परीविक्षा अधिकारी जिनसाजी चौधरी, सामाजिक कार्यकर्ता रमेश वाघ, माहिती विश्लेषक रवी एस. वानखडे तसेच मालेगाव तालुका संरक्षण अधिकारी महादेव जऊळकर यांच्याशी संपर्क करून बालविवाह रोखण्याचे आदेश दिले.
सदर पथकाने मालेगाव पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल बियाणी, मदतगार, समुपदेशक एम. गवळी, अंगणवाडी सेविका एन. गवळी, एन. माने, आशा सेविका मंगला नालटे, नंदा गोटे तसेच ग्राम बाल संरक्षण समितीचे सदस्य अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने अल्पवयीन बालिकेचे वडील व कुटुंबियांचे समुपदेशन करून बालविवाह प्रतिबंध कायद्यांतर्गत हमीपत्र लिहून घेतले. यावेळी उपस्थितांमध्ये कोरोना आजरा संबंधी काळजी घेवून कार्यवाही करण्यात आली. जिल्ह्यात अशाप्रकारे बालविवाह होत असल्यास ‘चाईल्ड लाईन’च्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांनी माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. राठोड यांनी केले आहे.




